मुंबई : मुंबई महापालिकेनं हाती घेतलेल्या कोस्टल रोडच्या भू-तांत्रिक सर्वेक्षणाची पाहणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गिरगाव चौपाटीवर केली. कोस्टल रोडची संकल्पना आपलीच आहे आणि त्याचे श्रेयही आपलेच आहे हे मुंबईकरांमध्ये रूजविण्यासाठी शिवसेनेने या पाहणी दौ-यापासून भाजपला पद्धतशीरपणे बाजूला ठेवले.
पालिका निवडणूक जवळ येवू लागल्यानं मित्रपक्ष भाजपही कोस्टल रोडचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याने केवळ शिवसेना नेत्यांनीच हा पाहणी दौरा केला. आज समाधानाचा दिवस आहे, मुंबईकरांनी जे कोस्टल रोडच स्वप्न पाहिलं होतं, त्याच्या प्राथमिक कामाला सुरवात झाली असून यात आणखी एक समाधानकारक बाब म्हणजे समुद्राखालील जमिनीची ही पाहणी सुरू आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
तसंच त्या समुद्राच्या तळाशी लागलेले दगड हे कोस्टल रोडच्या टनेलच्या कामासाठी अंत्यत योग्य असल्याचे मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. हे काम सुरू असताना गिरगाव चौपाटीच्या सौंदर्याला कुठलाही धक्का लागणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
मुंबईतील वाहतुकीच्या दृष्टीने अंत्यत महत्वपूर्ण असलेला कोस्टल रोडच्या भू तांत्रिक सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असले तरी पर्यावरण विभागाची परवानगी मिळणे बाकी आहे. ही परवानगी लवकरच मिळणार असून कामाची टेंडर प्रक्रियाही मार्चपर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिली आहे.