www.24taas.com, मुंबई
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समेटाच्या चर्चेला जोर चढला असताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा राज यांच्या मंगळवारच्या मोर्चाचं कौतुक केलंय. असे मोर्चे पुन्हा निघायला हवेत असं उद्धव यांनी स्पष्टपणे नमूद केलंय.
त्यामुळं ठाकरे बंधुंचे संबंध संघर्षाकडून समेटाकडे जात असल्याचेच स्पष्ट संकेत दिसत आहेत. राज ठाकरेंच्या आझाद मैदापर्यंत काढलेल्या मोर्चापूर्वीदेखील उद्धव ठाकरेंनी हिदुत्वाचा मुद्दा पुढं करत खुल्या दिलाने राज ठाकरेंचे समर्थन केले होते.
मोर्चासही शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला होता. राज ठाकरे यांनी सर्व विरोधकांनी या विषयावर एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे. ही बाब उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली असता उद्धव म्हणाले, शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका आहे. ही भूमिका मान्य असेल तर आम्ही मनसेबरोबर जाण्यास तयार आहोत. मात्र, आमचे हिंदुत्व प्रासंगिक नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं.
एवढंच नव्हे, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्य़ा मोर्चाच्या बातमीला शिवसेनेचं मुखपत्र सामनानं ठळक प्रसिद्धी दिली होती. राज ठाकरेंची बातमी पहिल्या पानावर ठळकपणे छापली. शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर राज ठाकरेंबाबतच्या बातम्यांना ‘सामना’त प्रसिद्धी मिळत नव्हती.
मात्र, गेल्या काही दिवसांत राज आणि उद्धव यांच्यातली कटूता कमी झाली असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच सामनामध्य़े राज यांच्या मोर्चाला ठळक प्रसिद्धी मिळाली. शिवसेना आणि मनसे यांच्यातही दरी कमी होत चालल्याचं यावरुनही स्पष्ट झालं. आता तर उद्धव ठाकरेंनी पुन्हा राज यांच्या मंगळवारच्या मोर्चाचं कौतुक केल्यामुळे पुन्हा राज-उद्धव यांच्या एकत्र येण्याचीच ही नांदी वाटू लागली आहे.