धक्कादायक, मुंबईला पुरवठा होणाऱ्या पाण्याची २७ टक्के चोरी

मुंबईकरांना सध्या वीस टक्के पाणीकपातीला सामोरं जावं लागतं असलं तरी मुंबईला पुरवठा होणा-या पाण्यापैकी सुमारे 27 टक्के पाण्याची चोरी आणि गळती होतं असल्याचं समोर आलंय. त्यामुळं पाणी चोरी आणि गळतीवर नियंत्रण मिळवलं असतं तर पाणीकपात झेलण्याची ही वेळ मुंबईकरांवर आली नसती.

Updated: Jul 4, 2014, 12:27 PM IST
धक्कादायक, मुंबईला पुरवठा होणाऱ्या पाण्याची २७ टक्के चोरी title=

मुंबई : मुंबईकरांना सध्या वीस टक्के पाणीकपातीला सामोरं जावं लागतं असलं तरी मुंबईला पुरवठा होणा-या पाण्यापैकी सुमारे 27 टक्के पाण्याची चोरी आणि गळती होतं असल्याचं समोर आलंय. त्यामुळं पाणी चोरी आणि गळतीवर नियंत्रण मिळवलं असतं तर पाणीकपात झेलण्याची ही वेळ मुंबईकरांवर आली नसती.

1 कोटी 35 लाखांहून अधिक लोकसंख्येच्या अवाढव्य अशा मुंबई शहराला सात तलावांच्या माध्यमातून मुंबई महापालिका पाणीपुरवठा करते. परंतु यंदा जून महिन्यात पावसानं ओढ दिल्यानं मुंबईकरांना सध्या वीस टक्के पाणीकपातीला सामोरं जावं लागत आहे. मुंबईतल्या पाणीपुरवठ्याचं आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

मुंबईला होणा-या पाणीपुरवठ्यापैकी 27 टक्के पाण्याची चोरी आणि गळती होते. मुंबईला रोज 3750 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. परंतु यापैकी सुमारे 1 हजार दशलक्ष लीटर पाण्याची रोज चोरी आणि गळती होते. यावर्षी जानेवारी ते मे या पाच महिन्यांमध्ये मुंबई शहरात 4862, पूर्व उपनगरात 4622 आणि पश्चिम उपनगरात 6126 अशा एकूण 15,610 पाणी गळतीच्या घटना समोर आल्या आहेत. तर याच कालावधीत मुंबई शहरात 794, पूर्व उपनगरात 610 आणि पश्चिम उपनगरात 419 अशा एकूण 1823 अनधिकृत पाणी कनेक्शनच्या घटना समोर आल्या आहेत.  

झोपडपट्यांमध्ये होणारी पाण्याची चोरी हा विषय गांभिर्यानं घेण्याची गरज आहे. राज्य सरकारनं 1995 पर्यंतच्या झोपड्या अधिकृत ठरवल्यानं त्यानंतरच्या अनधिकृत झोपड्यांना पालिका पाण्याचे कनेक्शन देवू शकत नाही. त्यामुळं या झोपडपट्ट्यांमध्ये पाणी चोरीचे प्रकार सर्रास आढळून येतात. परिणामी बीएमसीचा महसूल तर बुडतोच शिवाय पाण्याचे नियोजनही बिघडतं. पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाया जाणा-या पाण्याची किंमत पालिका प्रशासनाला आता चांगलीच कळत असेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.