दिनेश दुखंडे, मुंबई : ठाकरे... गेली अनेक दशकं महाराष्ट्राच्या राजकारणावर असलेला हा प्रभाव आता हळूहळू कमी होतोय की काय...? महाराष्ट्राच्या राजकारणाचा पॅटर्न बदलतोय... देवेंद्र फडणवीसांसारखा आश्वासक चेहरा महाराष्ट्रासमोर आलाय. महापालिकेच्या निकालानंतर दोन्ही ठाकरे बंधुंना गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आलीय.
बाळासाहेब ठाकरे.... गेली अनेक वर्षं महाराष्ट्राचं राजकारण या नावाभोवती फिरायचं... पण 17 नोव्हेंबर 2012 ला बाळासाहेबांचं निधन झालं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला आदरयुक्त दरारा संपला. बाळासाहेबांनंतरही दोघा ठाकरेंच्याच भोवती महाराष्ट्राचं राजकारण पिंगा घालेल, अशी दोघांची इच्छा आणि अपेक्षा होती... पण तिथेच पहिली चूक झाली...
बाळासाहेबांचं निधन झालं, त्याच वेळी नरेंद्र दामोदरदास मोदी नावानं मोठ्ठं वादळ देशात तयार होत होतं... 2014 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुका या वादळानं झपाटून गेल्या... आज 2017 मध्येही मोदी इम्पॅक्ट कायम आहे... देशातलं आणि पर्यायानं राज्यातलं राजकारण बदलत असताना ठाकरे बंधू मात्र 'ठाकरे' या आडनावाच्या वलयात आणि रेट्रो पॉलिटिक्समध्ये अडकून पडले... ठाकरे बंधू स्वतःमध्येच मश्गूल असताना भाजप मात्र महाराष्ट्र दणाणून सोडण्याचं धोरण आखत होतं... ठाकरे बंधू गाफील राहिले... आणि भाजपनं स्वबळावर स्वराज्याचं तोरण बांधण्याची तयारी सुरू केली.
भूतकाळाच्या वैभवात रमलेल्या ठाकरे बंधूंना काळाची पावलं ओळखता आली नाहीत... त्यामानानं भाजपाची दुसरी पिढी चाणाक्ष निघाली... धूर्त पण संयमीपणा राखत 'स्लो अँड स्टेडी विन्स द रेस' ही भाजपची स्ट्रॅटेजी होती... नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर विकास हा प्रमुख मुद्दा झाला... देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे दोन्ही चेहेरे विकासाचे होते... ब्रँड देवेंद्रचा उदय झाल्यावर हे फडणवीशी शहाणपण महागात पडेल याची जराशीही चाहूल ठाकरे बंधूंना लागली नाही.
भाषिक अभिमान, प्रांतीय अस्मिता, मराठी माणसाचा कैवार हे सगळे मुद्दे आता घासून घासून जुने झाले... आदित्य आणि अमितची पिढी या मुद्द्यांना भुलणारी नाही, हे उद्धव आणि राजना ओळखता आलं नाही... शिवसेना प्रांतिक अस्मितेचं संकुचित राजकारण करत असताना भाजपनं मराठी, गुजराती, उत्तर भारतीय या सगळ्यांना घेऊन सर्वसमावेशक आणि पर्यायानं बेरजेचं राजकारण केलं. बदलत्या राजकारणात अस्मितेपेक्षा व्हिजनला महत्त्व आहे. मोदी आणि फडणवीसांची ओळख 'व्हिजनपुरूष' अशीच आहे. प्रसंगी प्रवाहाच्या विरोधात जाण्याचं धाडस आहे... नोटाबंदीच्या मुद्द्यावर शिवसेना नेतृत्व टीका करत बसलं... आणि ते गणितही फसलं...
महापालिकेसाठी युती तुटली तेव्हा भाजपनं चोख वातावरण निर्मिती केली... भाजपनं वाईटपणा घेतला नाही, युती तुटल्याची घोषणा उद्धव ठाकरेंकडून झाली... त्यात सतत आगीत तेल ओतण्याचं काम केलं सामनानं... 'सामना'तून भाजपवर झालेली प्रसंगी पातळी सोडून झालेली टीका भाजपनं कधीच स्वतःच्या अंगाला लावून घेतली नाही, उलट या टीकेचं बूमरँग झालं आणि देवेंद्र फडणवीसांनीच सामना जिंकला.
मुळात ठाकरेंमध्ये राजा बोले, दळ हाले, अशी परंपरा आहे..... दोघाही बंधूंकडे आपापलं अष्टप्रधान मंडळ असलं तरी त्या मंडळाचं मातीशी नातं नाही. जिल्हा परिषद निवडणुकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गावोगावी काय चाललंय, याची खबर दोघाही बंधूंना नव्हती ..... मुंबई प्रतिष्ठेची करत उद्धव ठाकरेंचा जीव मुंबईच्या पिंज-यातच अडकून पडला.... पण त्याचवेळी देवेंद्र फडणवीसांनी मुंबई तर पिंजून काढलीच. पण गावोगावी फिरत 70 सभा घेतल्या.... या विरोधाभासानं जनतेमध्ये योग्य तो संदेश गेला.... आणि त्याचा परिणाम मतदानयंत्रांनी दाखवून दिला......
एकीकडे सत्तेत मन रमत नाही म्हणायचं आणि सत्तेच्या खुर्चीला चिकटूनही राहायचं, सरकारला नोटीस पिरीयडच्या धमक्या द्यायच्या, आणि दुसरीकडे लालदिव्याच्या गाड्या घेऊन फिरायच्या. सत्ता सोडायची म्हंटली की पक्षफुटीचं भूत गेली अडीच वर्षं पक्षनेतृत्वाच्या मानगुटीवर बसलंय. हा उंदीर-मांजराचा खेळ महाराष्ट्राची जनता गेली अडीच वर्षं पाहतेय.
जी परिस्थिती उद्धव ठाकरेंची, त्याहून कित्येक पटीनं वाईट अवस्था राज ठाकरेंची... तेही अजून लोकप्रियता आणि करिष्मा याच्या फसव्या मायाजालातून बाहेरच पडले नाहीत. लोकसभा पराभवानंतर मनसे जी खचली, ती परत उभीच राहू शकली नाही. जमेल तसं, जमेल तेव्हा राजकारण करायचं, अत्यंत ढिसाळ संघटन बांधणी, पक्षधोरण नाही, नेतृत्वाचा संपर्क आणि संवाद नाही...
फक्त निवडणुकीच्या काळातच कृष्णकुंजमधून बाहेर यायचं, लॅपटॉप प्रेझेंटेशन केलं, पण त्याला बराच उशीर झाला होता. या सगळ्या कारणांमुळे मनसेचं इंजिन पार सायडिंगला लागलंय. फक्त दुसऱ्यावर टीका करुन मनोरंजन होतं, पण मतं मिळत नाहीत हे एव्हाना राज ठाकरेंना उमगलं असेल पण शिकायची इच्छा आत्तापर्यंत तरी दिसली नाही...
या सगळ्यातून शिकले नाहीत, तर ठाकरे बंधूंची पुढची गणितंही चुकतंच जातील... महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणात दोन्ही ठाकरे बंधुंसाठी पुढचा काळ म्हणजे अस्तित्वासाठीचा संघर्ष असणार आहे... पूर्वपुण्याईवर नव्हे तर स्वकर्तृत्वावर पक्षासाठीची लढाई लढावी लागेल... काळ कधीच कुणासाठीही थांबत नाही, राजकारणही त्याला अपवाद नाही...