मुंबई : मालवणी भागातील काही हॉटेल्सवर छापा टाकत 'मॉरल पोलिसिंग'चा मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी चांगलाच समाचार घेतलाय.
पोलिसांच्या या कारवाईवर अनेक सेलिब्रिटी, विचारवंत आणि सामान्यांनीही टीका केली होती. त्यानंतर मॉल्समध्ये फिरणारे जोडपे, पार्क आणि समुद्र किनाऱ्यांवर हातात हात घालून फिरणाऱ्या जोडप्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्याचे आदेशच पोलीस आयुक्तांना काढावे लागलेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मारियांनी पोलिसांना हॉटेल रुममध्ये आणि फ्लॅटमध्ये घुसून कारवाई करण्यासही मनाई केलीय. नागरिकांनी कसं वागावं याचे नियम लादणं आणि त्यांना सल्ले देणं हे काम पोलिसांचं नाही, असं सांगतानाच असं करून नागरिकांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा पोलिसांना अधिकार नाही, हेही मारियांनी त्यांच्या पोलिसांना ठणकावून सांगितलंय.
यासाठी त्यांनी एक पत्रकही काढलंय. शिवाय, देहव्यापारा संदर्भात (पिटा) कायद्याअंतर्गत कारवाई करताना स्थानिक पोलीस उपायुक्तांच्या परवानगीनंच ही कारवाई व्हायला हवी, असंही या पत्रकात म्हटलंय.
६ ऑगस्ट रोजी अतिरिक्त आयुक्त फतेह सिंग पाटील यांनी मढ आणि अक्सा बीचवर कारवाई करत लॉजेसमधून 'सार्वजनिक ठिकाणी अश्लीलते'च्या आरोपाखाली ६१ जणांना अटक केली होती. त्यानंतर मारियांना हे आदेश काढावे लागलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.