www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
टोलच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुरू केलेलं रास्ता रोको आंदोलन अवघ्या ३६० मिनिटांत संपलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी सकाळी चर्चेसाठी बोलावल्यानं, राज ठाकरेंनी ३६० अंशात यू टर्न घेत, आंदोलन मागे घेतलं. चर्चाच करायची होती, तर आजचं आंदोलन करून राज ठाकरेंनी काय साधलं? असा सवाल उपस्थित केला जातोय.
`राज ठाकरेंच्या चर्चा करणार नाही, दरोडेखोरांशी काय चर्चा करायची` असं म्हणत आंदोलनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मंगळवारी राज ठाकरेंनी आपले आक्रमक तेवर दाखवले होते. पण, आजचं आंदोलन ढूस्स झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी उद्या चर्चा करणार असल्याचं सांगत आंदोलन मागे घेतल्याचं सांगत राज ठाकरे घरी परतले. आता राज ठाकरेंचा सरकारशी झालेला हा `तह` म्हणायचा का?
सरकार`राज` कुछ बदले बदले से नजर आ रहे है.... राज ठाकरेंची मंगळवारची कडक भूमिका आणि आजचा पवित्रा एकदम बदललेला दिसतोय.
टोलच्या मुद्यावरून राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिल्यानंतर सरकारनं चर्चा करण्याची तयारी दाखवली होती. परंतु राज ठाकरेंनी मीडियासमोर चर्चा करण्याची अट घातली. त्यामुळं मनसेच्या `खळ्ळ-खटॅक` नाटकाचा प्रयोग राज्यभर जोरदार रंगणार, असं बोललं जात होतं. परंतु आज सकाळपासून राज्यभरात सुरू झालेलं आंदोलन काही अपवाद वगळता शांततेत पार पडलं. काही तुरळक ठिकाणी मनसेच्या आंदोलनामुळं ट्रॅफिक जॅम होऊन वाहतूक कोंडी झाली. त्याचा फटका सामान्य माणसांना बसला. परंतु आजचं आंदोलन नेहमीसारखं `मनसे स्टाइल` नव्हतं. त्यामुळे शिवसेना नेत्यांना खिल्ली उडवण्याची आयतीच संधी मिळाली.
राज ठाकरे स्वतः वाशीनाक्यावर आंदोलन करण्यासाठी सकाळी कृष्णकुंजवरून निघाले. मनसेचे आमदार आणि असंख्य कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते. त्यांचा ताफा चेंबूर भागात आल्यानंतर पोलिसांनी राजमार्ग रोखून धरला. राज ठाकरेंवर प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी मनसैनिक आणि पोलिसांची बाचाबाची रंगली. राज ठाकरेंना आरसीएफ पोलीस ठाण्यात नेण्यात आल्यानंतर, शर्मिला ठाकरे स्वतः पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या देऊन बसल्या. राज ठाकरेंना अटक झाल्याचा मनसे कार्यकर्त्यांचा समज झाल्यानं राज्यभरात आंदोलनाला हिंसक गालबोट लागलं. काही भागात दगडफेक व गाड्यांची तोडफोड करण्यात आली. मात्र, ही केवळ प्रतिबंधात्मक कारवाई असल्याचा खुलासा पोलिसांनी केला.
अडीच तास आरसीएफ पोलिसांच्या ताब्यात असलेल्या राज ठाकरेंना दुपारी साडे बाराच्या सुमारास सोडून देण्यात आलं. पोलीस ठाण्यात असताना राज ठाकरेंची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलणी झाली आणि चर्चेसाठी गुरूवारी सकाळचा मुहूर्त ठरला.
सरकार आणि राज ठाकरे यांच्यात तह झाल्याच्या चर्चेला यानिमित्तानं पुन्हा उधाण आलंय. मीडियासमोर चर्चा करण्याची राज ठाकरेंची अट सरकारने मान्य केलीय का? अटी मान्य केलेल्या नसताना राज ठाकरे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करायला तयार कसे झाले? चर्चाच करायची होती तर आंदोलनाचा फार्स केला तरी कशासाठी? सामान्य जनतेचा रस्त्यावर खोळंबा का केला? असे सवाल निर्माण झालेत. राज ठाकरेंच्या आंदोलनामुळं टोलचा मुद्दा ऐरणीवर आला असला तरी टोल माफी होण्याची चिन्हं नाहीत आणि मुख्यमंत्र्यांच्या चर्चेतून उद्या काहीच निष्पन्न झाले नाही तर राज ठाकरेंनी आंदोलनातून काय साध्य केले, हा मोठा प्रश्न उरतोच.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.