राज्यात एकीकडे शालेय शुल्क म्हणजेच फी संदर्भातला कायदा अस्तित्वात येत असताना, येत्या शैक्षणिक वर्षांपासून एक नवा बोजा पालकांवर पडणार आहे. स्कूल बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याचा विमा उतरवण्याचे आदेश शिक्षण आणि परिवहन विभागानं दिले आहेत.
सुरक्षित आणि सुनियोजित विद्यार्थी वाहतुकीची किती बोंब आहे, हे आजपर्यंत अनेक अपघातांनी सिद्ध केलंय. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात एक ताजा अध्यादेश जारी कऱण्यात आलाय. या अध्यादेशानुसार स्कूल बसमधून वाहतूक करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विमा उतरवणं बंधनकारक करण्यात आलंय. महत्त्वाचं म्हणजे या विमा योजनेचा खर्च विद्यार्थ्यांच्या पालकांना सोसावा लागणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार सरकारकडून होत असल्यानं पालकांनी याचं स्वागत केलंय. पण त्याचा सगळा भार पालकांवर टाकणं त्यांना मान्य नाही. शाळांकडून वेगवेगळ्या सबबीखाली पालकांची पिळवणूक सुरू असते. आता विमा योजनेच्या नावाखाली शाळांच्या हातात आयतं कोलीत मिळालंय. विद्यार्थ्यांची सुरक्षितता नक्कीच महत्त्वाची आहे. पण शाळांच्या मनमानीनं आधीच हैराण असलेल्या पालकांसाठी हा नवा ताप ठरणार आहे.