भाजप नेते उद्या बाळासाहेबांच्या भेटीला

शिवसेना-भाजप युतीत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते उद्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहे. उद्या दुपारी बारा वाजता मातोश्रीवर ही भेट ठरली आहे.

Updated: Feb 24, 2012, 08:54 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

शिवसेना-भाजप युतीत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते उद्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहे. उद्या दुपारी बारा वाजता मातोश्रीवर ही भेट ठरली आहे.

 

भाजपकडून ज्येष्ठ नेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आणि अन्य नेतेही यावेळी बाळासाहेबांना भेटणार आहेत. युतीतल्या विसंवादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. नाशिक महापौर निवडीबाबतही भाजपचे नेते बाळासाहेबांची भूमिका जाणून घेणार आहेत. नाशिकमध्ये मनसेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्यानं राज ठाकरे यांनी मनसेचाच महापौर होईल असा निर्धार व्यक्त केला आहे. त्यासाठी त्यांना अन्यपक्षाची आवश्यकता लागणार आहेत.

 

या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप-रिपाई या महायुतीची काय भूमिका घेते याबाबत उत्सुकता आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हापरिषद आणि महापालिका निवडणूकीच्या निकालांच्या पाश्वभूमीवर राज्यातल्या राजकारणावरही या भेटीत चर्चा होणार आहे.

 

काय म्हणाले होते गडकरी

सेनाप्रमुखांना फोन केला तर त्यांच्या पर्यंत तो पोहचत नाही असा खळबळजनक गौप्यस्फोट झी २४ तासचे बातमीदार अखिलेश हळवे यांच्याशी बोलताना  नितीन गडकरींनी केला होता. सामनाचे संपादक संजय राऊत हे सातत्याने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, गोपीनाथ मुंडे, मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि माझ्याबद्दल सातत्याने टीका करतात. तसंच लिखाणाचा स्तरही चांगला नसतो. भविष्यात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमधील संबंध चांगले राहावेत असं वाटत असल्यास संजय राऊत यांनी याचा विचार करावा.

 

काय म्हटले होते राऊत

सामना’त काय लिहावे हे गडकरींनी आम्हांला सांगू नये, यासाठी बाळासाहेब आहेत.  सामना’मध्ये यापूर्वी अनेकवेळा गडकरी यांच्याबद्दल चांगले लिहून आले आहेत. सामनातील प्रत्येक शब्द तोलून मापून वापला जातो. ज्या ठिकाणी टीका करायची त्या ठिकाणी टीका होणारच, पण आम्ही कौतुकही करतो, असे प्रत्युत्तर ‘सामना’चे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.

 

काय म्हणाले जावडेकर

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या या खोचक टोलेबाजीनंतर भाजपनं राऊतांवर पलटवार केला. फोनच्या वादात राऊत यांनी पडू नये, असा सल्ला भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी दिला. शिवसेनाप्रमुखांबाबत पूर्ण आदर आहेच, मात्र गडकरीही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.