www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर
सभ्य आणि सुशिक्षित समाजाला काळिमा फासणारी घटना चंद्रपुरात घडलीय. उच्च विद्याविभूषित तरुणीचं लग्न हुंड्याच्या मागणीमुळे मोडलंय. पोलिसांनी नियोजित नवरदेवासह चौघांना गजाआड केलंय.
एका वर्तमान पत्रात दिलेल्या जाहिरातीनं आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगविणाऱ्या एका मुलीच्या भावविश्वाचा चुराडा केला. अवघ्या चार ओळींची ही जाहिरात वरतून एखादं साधं जाहीर प्रकटन वाटावी अशी... मात्र, यामागे दडलीय सभ्य समाजाच्या सुशिक्षितपणाचे बुरखे फाडणारी मानसिकता...
काय घडलं नेमकं...
नाव : रोहिणी लीलाधर तालेवार, शिक्षण : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई इथली पत्रकारितेचा पदव्युत्तर अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी... मुळची चंद्रपूर शहरात राहणारी रोहिणी आपले शिक्षण पूर्ण करून लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तयार झाली होती. रोहिणीचे वडील लीलाधर तालेवार सेवानिवृत्त झाल्यावर कुटुंबाला आधार म्हणून ६५ व्या वर्षी चार हजाराची नोकरी करून मुलीला उच्चशिक्षण देत आहेत.
ऑगस्ट २०१३ मध्ये चंद्रपूर शहरात राहणाऱ्या राजू गुंडेटी यांचा मुलगा जयदीपशी रोहिणीचे रीतीभातीप्रमाणे लग्न ठरले... साक्षगंधही झाला... जयदीपचे वडील राजू गुंडेटी, चंद्रपूरच्या आयुर्विमा कार्यालयातून शाखा व्यवस्थापक म्हणून निवृत्त झालेले... स्वतः जयदीप मुंबईत एका बहुराष्ट्रीय कंपनीत केमिकल इंजिनियर म्हणून मोठ्या पगारावर आणि बड्या हुद्यावर... ऑगस्ट पासून एप्रिल २०१४ च्या ५ तारखेपर्यंत सारे काही एखाद्या सामान्य घरात चालावे तसे सुरु होतं.
मात्र, ५ एप्रिल रोजी वरपक्षाने मुलासाठी मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी १० लाख रू. रोख हुंडा रकमेची मागणी केली. मागणी ऐकताच वधूचे वडील अस्वस्थ झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेने घाबरलेल्या वराकडच्या मंडळीनी `१० लाख नको` असे म्हणत २१ तारखेला लग्न नक्की, अशी थाप मारून वेळ मारून नेली आणि...
तब्बल पाच दिवसांनी स्थानिक वर्तमानपत्रात वराकडच्या मंडळीनी चक्क लग्न रद्द झाल्याची एकतर्फी जाहीर सूचना दिली. यामुळे तालेवार कुटुंबावर आभाळच कोसळलं. आपल्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात वैवाहिक आयुष्य व छळ यावर प्रबंध सादर करणाऱ्या रोहिणीला शिक्षणानेच धीर दिला. तिने हिंमतीने घडल्या प्रकाराची तक्रार पोलिसात दिली.
तालेवार कुटुंबात रोहिणीच्या लग्नासाठी लागणारी सर्व तयारी झाली होती. विवाहाच्या पत्रिका नातेवाईकांना पोहचल्या होत्या. गेले आठ महिने सर्व काही सुरळीत सुरु होते. मात्र अचानक १० लाखांची मागणी झाली आणि होत्याचं नव्हतं झालं.
पोलिसांनीही १२ तासाच्या आत नियोजित नवरदेव , त्याचे आई-वडील आणि मावसभाऊ अशा चौघांना अटक केली. या प्रकरणातील कहर म्हणजे आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी आरोपींनी मुलगी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची आवई उठविली आहे. सभ्य आणि सुशिक्षित समाजाला काळिमा फासणारी ही घटना आहे
व्हिडिओ पाहा -
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.