www.24taas.com, झी मीडिया, राळेगणसिद्धी, नवी दिल्ली
लोकपाल विधेयक लोकसभेत मंजूर होताच नऊ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अण्णांनी सोडलं. शाळेतल्या विद्यार्थिनीच्या हातून अण्णांनी ज्यूस घेतलं. त्यानंतर अण्णांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या राळेगणवासियांनी जल्लोष केला. या जल्लेषात स्वत: अण्णाही सहभागी झाले. दरम्यान, अण्णांनी आपले आधीचे सहकारी अरविंद केजरीवाल यांना जोराचा चिमटा काढला.
लोकपाल बिल पास झाल्यानंतर उपोषण सोडण्यापूर्वी अण्णांनी केजरीवालांना नाव न घेता टोमणा मारला. गर्दी करणा-या लोकांना खाली बसण्याची विनंती करताना `मला कॅमे-यासमोर येण्याची हौस नाही`, अशा शब्दांत नाव न घेता चिमटा काढला. आम आदमी पार्टीनं या लोकपाल बिलावर टीका केलीये. हा लोकपाल तकलादू असल्याचा आरोप पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी केलाय.
तब्बल ४५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारताला लोकपाल मिळालाय. राज्यसभेने काल मंजूर केलेले ऐतिहासिक लोकपाल विधेयक आज लोकसभेतही आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलं. समाजवादी पार्टीचा अपवाद वगळता अन्य सर्व राजकीय पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. भ्रष्टाचाराच्या विरोधातील हा महत्त्वपूर्ण लोकपाल कायदा संमत करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण सुरू केलं होतं. लोकसभेनं लोकपाल मंजूर करताच राळेगणमध्ये अण्णांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
राळेगणवासियांनी तिरंगे फडकावून आणि अण्णांचा जयघोष करत लोकपाल विधेयकाचं स्वागत केलं. संसदेत सुमारे अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर लोकपाल विधेयक संमत झाल्यानंतर, अण्णा हजारेंनी आपलं उपोषण सोडलं. भ्रष्टाचाराच्या विरोधात गेल्या दोन-तीन वर्षांपासून अण्णा हजारे आणि त्यांच्या सहका-यांनी सुरू केलेल्या अभूतपूर्व लढ्याचं हे यश मानलं जातंय.
भ्रष्टाचाराच्या विरोधात अण्णा हजारेंनी दोन वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये केलेल्या आंदोलनाला देशवासियांचा अभूतपूर्व पाठिंबा मिळाला. अवघा देश अण्णांच्या आंदोलनात सहभागी झाल्यानं केंद्रातील सरकारही हादरून गेलं. आम आदमी रस्त्यावर उतरल्यानंतर काय क्रांती घडवू शकतो, याचं ज्वलंत उदाहरण अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या निमित्तानं पाहायला मिळालं.
दरम्यान, यंदाच्या हिवाळी अधिवेशनातच भ्रष्टाचाराच्या विरोधातील लोकपाल विधेयक संमत व्हावं, यासाठी पुन्हा एकदा अण्णांनी उपोषण आंदोलनाचा एल्गार पुकारला. यावेळी अरविंद केजरीवाल आणि त्यांचा आम आदमी पक्ष आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी नसला तरी अण्णांच्या लढ्यात त्यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. एवढंच नव्हे तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या पुढाकारामुळेच संसदेत लोकपाल विधेयक संमत झालंय. आता या कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा अण्णा हजारेंनी व्यक्त केलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.