www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळांची उमेदवारी जाहीर करून शरद पवारांनी त्यांचा गेम केल्याची खमंग चर्चा रंगलीय. अनेक दिग्गज मंत्र्यांना लोकसभेची उमेदवारी देणार, असं आधी पवारांनी सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात एकट्या भुजबळांनाच लोकसभेवर पाठवून पुतणे अजित पवारांचं वर्चस्व वाढवण्याचा पवारांचा प्रयत्न आहे की काय, असं बोललं जातंय. त्यामुळं भुजबळ समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदतोय.
छगन भुजबळांचं हे येवला मतदारसंघातलं संपर्क कार्यालय....या कार्यालयात बैठक रंगलीय ती भुजबळांच्या समर्थनार्थ नव्हे तर चक्क विरोधात.... कारण लोकसभेसाठी छगन भुजबळांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानं भुजबळ समर्थकांनी आता पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्याची रणनिती आखलीय. त्याचसाठी शनिवारी येवला बंदची हाकही देण्यात आलीय. इतकंच नाही तर राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आपल्या पदांचे राजीनामे देणार असून रास्ता रोको करत पवारांचा निषेध करणार आहेत.
छगन भुजबळांना लोकसभा उमेदवारी देऊन शरद पवरांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आहे. स्वतःच्या पक्षासाठी लोकसभेच्या जागा वाढविणे, नाशिकमध्ये सर्वच विरोधकांना चित करणे, भुजबळांचं वाढतं प्रस्थ कमी करणे, अजित पवारांसाठी मैदान खुले करणे, अशी अनेक लक्ष्यं साधली आहेत. स्वतः छगन भुजबळ केंद्रात जायला फारसे इच्छुक नाहीत आणि समीर भुजबळांना राज्यातल्या राजकारणात रस नाही. त्यामुळे मोठ्या भुजबळांना तिकीट दिल्यानं काका-पुतण्यात वाद निर्माण होण्याची शक्यताही बोलून दाखविली जातेय.
पवारांचं धक्कातंत्र कुठे कसं काम करेल, याचा नेम नाही. त्यामुळंच आता भुजबळ कुटुंबियांकडून दबावतंत्राचं राजकारण सुरू झालंय. भुजबळ समर्थकच त्यांच्या उमेदवारीच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरत असल्यानं प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत राजकारणाचे अनेक रंग पाहायला मिळणार आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.