www.24taas.com, नाशिक
राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली तरी नाशिककरांची पाण्याची समस्या कायम आहे. नाशिकच्या बहुतेक भागांत अतिशय कमी दाबानं आणि अनियमित पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे नाशिककर आता रस्त्यावर उतरु लागलेत. प्रशासन मात्र अजूनही आश्वासनापलीकडे काहीच देत नाही.
सिडको परिसरात राहणाऱ्या महिलांचा पाण्यासाठी संतप्त मोर्चा काढण्यात आला. सिडकोच्या योजनानगर, राजीव नगर, पाथर्डी फाटा परिसरातल्या नागरिकांना गेल्या चार महिन्यांपासून पाणीकपातीचा सामना करावा लागतोय. वीज पुरवठा खंडित असल्यानं पाणीपुरवठा होत नसल्याचं कारण देण्यात आलं. पण वीज पुरवठा सुरळीत झाल्यावरही रात्री, अपरात्री पाणी येतं, तेही कमी दाबानं, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
प्रशासन मात्र पुढचे काही महिने पाणीकपात कायम राहणार असल्याचं सांगतंय. अजमितीला गंगापूर धरणामध्ये 85 टक्क्यांपेक्षा जास्त पाण्याचा साठा आहे. विरोधक गेल्या काही दिवसांपासून पाणीकपात मागे घेण्याची मागणी करत आहेत. पण महापौर मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. ज्या भागात पाणी टंचाई आहे, त्या भागात मनसेचे तीन नगरसेवक आहेत. त्यातच शिवसेनेनं आंदोलनाचा इशारा दिल्यानं प्रशासनावरचा पाणीकपात रद्द करण्याचा दबाव वाढणार आहे.