निवडणूक तिकीटांवरून पुन्हा मराठा X ओबीसी संघर्ष

पुण्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी बोगस ओबीसींना उमेदवारी दिल्याचा आरोप ओबीसी संघर्ष संघटनेनं केला आहे. हे उमेदवार निवडून आले तर त्यांच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा ओबीसी संघर्ष संघटनेनं दिला आहे.

Updated: Feb 11, 2012, 03:20 PM IST

अरुण मेहेत्रे www.24taas.com, पुणे

पुण्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी बोगस ओबीसींना उमेदवारी दिल्याचा आरोप ओबीसी संघर्ष संघटनेनं केला आहे. हे उमेदवार निवडून आले तर त्यांच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा ओबीसी संघर्ष संघटनेनं दिला आहे.

राजकारणातील ओबीसी-मराठा वाद पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. एरवी मराठा म्हणून मिरवणारे पुढारी निवडणुकीत मात्र कुणबी झाले आहेत. निवडणुकीत आरक्षणाचा लाभ उठवण्यासाठी त्यांनी ओपन ऐवजी ओबीसी होणं पसंत केलं आहे. पुण्यामध्ये अशा ३७ बोगस उमेदवारांना विविध राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ओबीसीसाठी राखीव असलेल्या ४१पैकी २५ च्या आसपास जागा कुणबींना मिळणार आहेत. मात्र असे उमेदवार विजयी झाले तर त्यांना न्यायालयात खेचण्याचा इशारा ओबीसी संघर्ष संघटनेनं दिला आहे.

महापालिका निवडणूकीत राष्ट्रवादीनं ११,महायुतीनं १०, काँग्रेसने ९ तर मनसेनं ६ कुणबींना उमेदवारी दिली आहे. यापैकी बऱ्याच जणांनी यापूर्वी ओपन प्रवर्गातून निवडणूक लढवली आहे. मात्र जातपडताळणी समितीनं त्यांना प्रमाणपत्र दिल्याने त्यावर आक्षेप घेता येणार नाही अशी भूमिका राजकीय पक्षांनी घेतली आहे. वर्चस्वाच्या राजकारणातून निर्माण झालेला हा वाद आरक्षणाच्या धोरणानंतरही मिटण्याची चिन्ह नाहीत.