www.24taas.com , मुंबई
महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी डावपेच सुरू आहेत. कोणी जागा वाटपात आपल्याला कशा जास्त जागा पदरात पाडतील याकडे लक्ष देत आहे. तर काहीजण आघाडी आणि युतीवर भर देत आहेत. निवडणुकीत स्टार प्रचारक उतरण्यावर भरही दिला जात आहे. मनसेने राज ठाकरेंच्या 'होम मिनिस्टर'ना मैदानात उतरविले आहे. आता तर शिवसेनेने ठाणे, मुंबईत सत्ता राखण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मैदानात आणण्याचे ठरविले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही महायुतीच्या प्रचारासाठी सभा घेऊन आशीर्वाद देण्याची इच्छा आहे. त्यासाठी मुंबई आणि ठाण्यात शिवसेनाप्रमुखांच्या दोन प्रचारसभा होतील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे महायुतीचे स्टार प्रचारक शिवसेनाप्रमुखच असतील हे आता स्पष्ट झाले आहे. मनसे अध्य़क्ष राज ठाकरे यांच्या सभांना तरूणांचा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून आले आहे. मनसेला शह देण्यासाठी आता मुंबई-ठाण्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना उतविले जात असल्याची चर्चा आहे.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता उलथवून टाकण्याचा निर्धार करीत शिवशक्ती-भीमशक्तीने मुंबई महापालिकेवर भगवा-निळा फडकविण्याचे रणशिंग फुंकले आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली . मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना १३५, भाजप ६३ तर रिपाइं २९ जागा लढविणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आणि रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी यावेळी केली.
राज्यातील ठाणे, नाशिकसह नऊ महापालिकांतील तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून त्याची घोषणाही लवकरच केली जाईल, असेही महायुतीच्या नेत्यांनी जाहीर केले. मात्र, दुसरीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादीत जागावाटपाच्या खेचाखेचीवरून काहीतरी धुसफूस सुरू आहे. बंडखोरीच्या भीतीने दोन्ही कॉंग्रेसने जागावाटप जाहीर करण्याचे टाळले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता निवडणुकीत रंग भरण्यास सुरूवात झाली आहे.