www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे... रोजच्या व्यवहारात आपण नोटांचा वापर करतो... नोट घेतांना फारसं लक्ष देत नाही. पण, त्यामुळं तुम्हाला तुमच्या कष्टाच्या कमाईवर पाणी सोडण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याचं कारण आहे बनावट नोटा...
तुमच्याकडे असणाऱ्या पाचशे रुपयांच्या नोटा पुन्हा एकदा निरखून पाहा... या नोटा वरवर दिसायला अगदी खरी वाटत असल्या तरी एक साधा कागदाचा तुकडा एवढीच काही नोटांची किंमत असू शकते. कारण, ती पाचशेची नोट बनावटही असू शकते. नुकताच, कोल्हापूरात बनावट नोटांचा सुळसुळाट झाल्याचं उघड झालंय. राजारामपूरी परिसरात राहणाऱ्या डॉक्टर प्रिया उपाध्ये यांना त्याचा फटका बसला. एका पेशंटकडून त्यांना ही पाचशे रुपयांची बनावट नोट मिळाली. पण जेव्हा डॉ, प्रिया उपाध्ये ही नोट बँकेत जमा करण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना ही नोट बनावट असल्याचं समजलं. रोजच्या व्यवहारात एखादी बनावट नोट मिळाल्यास लोक त्याची कुठे वाच्यता करत नाहीत. पोलिसांचा ससेमीरा मागे लागू नये म्हणून लोक गप्प राहणं पसंत करतात. मात्र, डॉ. उपाध्ये यांनी बनावट नोटांच्या विरोधात आवाज उठवण्याचं धाडस केलं.
चलनात काही बनावट नोटा येत असून लोकांनी नोटा घेताना त्या पारखून घेण्याची सूचना बँकेच्या अधिकारी करतात. नोटेची सत्यता ओळखण्याचे आठ फिचर्स असून त्या माध्यमातून तुम्हीही बनावट नोट सहज ओळखू शकता. तेव्हा यापुढे दुसऱ्या व्यक्तीकडून नोट स्वीकारण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहा. अन्यथा तुमची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.