www.24taas.com, झी मीडिया, सातारा
गुलमोहोराच्या झाडाला प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्थान असतं. वैशाख वणव्यातल्या नाजूक स्नेहबंधनाला धुमारे फुटणारा भारदार वृक्ष म्हणजेच गुलमोहोर... या गुलमोहोराचं महत्त्व पटवून देण्यासाठी सातारकर गेली १५ वर्ष गुलमोहोर डे साजरा करतात.
१ मे १९९९ या दिवशी सातारा जिल्ह्यात एक सांस्कृतिक चळवळ सुरू झाली. वैशाख वणव्यातही डोळ्यांना सुखद अनुभव देणाऱ्या गुलमोहोराच्या झाडाबद्दल समाजात जागृती निर्माण करण्याचं काम या मोहिमेंतर्गत केलं जातं. सातारा शहरात पोवईनाका परिसरात सुमारे ६७ गुलमोहोराची झाडं आहेत. लाल केशरी फुलांनी ही झाडं बहरून येतात तेव्हा संपूर्ण रस्त्यावर फुलांचा लालकेशरी गालिचा अंथरला जातो. अशा या भावस्पर्शी गुलमोहोरी रस्त्यावर प्रत्येक १ मेला ड्रॉगो, इन्का आणि आस्था या पर्यावरण संस्था गुलमोहोर डे साजरा करतात. या दिवशी विविध वयोगटातले कलाप्रेमी इथे एकत्र येऊन कलाविष्कार करतात. कोणी सुंदर चित्र काढत असतात तर कोणी कविता करतात. तर कोणाला गुलमोहोराच्या झाडाखाली एखादी प्रेमकहाणी सुचते.
गुलमोहोर डेचं खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जमणारी कलाकारांची मांदियाळी.. गुलमोहोराच्या सावलीत अनेकांना कविता स्फूरते...
सखे तुला आठवते... ती पहिली भेट…
ओठांना जे जमले नाही, ते अंगठ्याने मातीत कोरले होते…
वसंताच्या स्वागताला ते गुलमोहोराचे झा़ड पुढे सरसावले होते...
अशा सुंदर काव्यपंक्तींनी मग रंगत येत जाते. कला, संस्कृती आणि पर्यावरण याचं अनोखं मिश्रण या गुलमोहोर डेच्या माध्यामातून सातारकांनी जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. गेली पंधरा वर्ष हा सुंदर दिवस साताऱ्यात रंगतोय. रांगड्या साताऱ्याची ही एक सुंदरशी नाजूक हवीहवीशी बाजू...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.