www.24taas.com, झी मीडिया, नगर
बहिणीचे दलित तरुणासोबत प्रेमसंबंध मान्य नसल्यानं भावानं 17 वर्षीय तरुणाला जबर मारहाण करून ठार मारण्याचा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड इथं घडलाय. या प्रकरणात आरोपी भावासोबत आणखी दोघांवर जणांवर हत्येसोबतच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, खर्डा इथं राहणारा नितीन राजू आगे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता बारावीत शिकत होता. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेल्या नितीनचे एका तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. पण, दोघांच्याही घरी जेव्हा या प्रकाराची कुणकुण लागली तेव्हा मात्र मुलीच्या भावानं हौसराव गोलेकरनं या संबंधांना तीव्र विरोध दर्शवला. त्यानंतर हौसरावच्या निशाण्यावर नितीन आला.
28 एप्रिल रोजी 21 वर्षीय हौसराव गोलेकर, शेषराव येवले (42 वर्ष) आणि आकाश सुर्वे यांनी नितीनचा काटा काढण्याचा डाव रचला. नितीन उन्हाळी तासिकेकरता गेला असताना या तिघांनी विद्यालयात जाऊन नितीनला जबर मारहाण केली. इतक्यावरच त्यांचा राग क्षमला नाही आणि या तिघांनी गळा आवळून नितीनची हत्या केली.
त्यानंतर आत्महत्येचा बनाव रचत त्यांनी नितीनचा मृतदेह निर्जनस्थळी लिंबाच्या झाडाला अर्धवट अवस्थेत लटकविला. नितीन घरी न आल्याने राजू आगे यांनी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्याची शोधाशोध सुरू केली. पण, त्यांच्या हाती लागला तो नितीनचा मृतदेह....
नितीनचे वडील राजू आगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे. वैद्यकीय अहवाल नितीनचा मारहाण, दोरीने गळा आवळून खून झाल्याचा अहवाल जामखेडच्या सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मुंढे यांनी दिला. पोलिसांनी या प्रकरणातील तीनही आरोपींना अटक करून त्यांच्यावर खून व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.