www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
कोल्हापूर पोलिसांनी ‘सिरीयल किलिंग’ प्रकरणी एकाला अटक केलीय. ताब्यात घेण्यात आलेला दिलीप लहरी हाच सिरीयल किलर असल्याचा दावा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केलाय.
शाहुपुरी पोलीस स्टेशनच्या पोलिसांकडून या संशयिताची कसून चौकशी सुरु आहे. दिलीप लहरी असं या संशयिताचं नाव असून त्यानं दोन खुनांची कबूलीही दिलीय, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिलीय. या इसमानं रेल्वेस्टेशन समोरील बस स्टॉपवरील आणि पारिख पूलसमोरील झालेल्या खूनाची कबूली दिल्याचं बोललं जातंय. कोल्हापूरचे आयजी तुकाराम चव्हाण, एसपी विजयसिंह जाधव, अॅडिशनल एसपी ज्योतिप्रिया सिंह यांच्याबरोबरच अनेक पीआय या आरोपीची कसून चौकशी करत आहेत.
कोल्हापूरात गेल्या तीन महिन्यांत एकाच पद्धतीनं तब्बल १० खून झालेत. त्यामुळे हा सिरियल किलिंगचा प्रकार असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. यातील केवळ एका खुनाचा तपास लावण्यात पोलीस यशस्वी ठरले होते. पण, बाकीचे खून मात्र अनुत्तरीत होते. त्यामुळे पोलिसांवर चहूबाजूंनी टीका होत होती. त्यानंतर हा तपास मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्चकडे सोपवण्यात आला होता. गुरुवारी संध्याकाळीच मुंबई पोलिसांची टीम कोल्हापुरात दाखल झालीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.