www.24taas.com, झी मीडिया, सांगली
सांगली महापालिकेच्या निवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय...या प्रचारसभेत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोनिया गांधींवर टीका करणा-यांचा खरपूस समाचार घेतला...
सोनियांवर बोलण्याची कुवत तरी आहे काय असा सवाल त्यांनी केला... आम्ही टीका केली तर पळता भुई थोडी होईल असा इशारा राणेंनी विरोधकांना दिला... तर सोनिया गांधी आघाडीच्या नेत्या आहेत. त्यांचे नाव काढण्याचा प्रश्नच उदभवत नाही असं प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी राणेंना दिलंय..
भास्कर जाधवांचा माणिकरावांवर प्रतिहल्ला
सांगली महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना निशाणा केलंय. जयंत पाटील हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलाय. तर माणिकराव नैराश्यातून बोलत असल्याचा टोला जयंत पाटलांनी लगावलाय.
सांगली महापालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातल्या प्रचारसभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी असं वक्तव्य करून महापालिकेवर पकड असलेल्या जयंत पाटलांवर बॉम्बगोळा टाकला. त्यांचं हे वक्तव्य सांगलीतच काय राज्यभरात चर्चेचा विषय ठरला. खुद्द जयंत पाटलांनाही या वक्तव्याची दखल घ्यावी लागली.
माणिकरावांच्या गौप्यस्फोटाला जयंत पाटलांनीही उत्तर दिलं आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानंच राज्यात तीन टर्म सत्ता असल्याची आठवण जयंत पाटलांनी माणिकरावांना करून दिली. संशयकल्लोळ निर्माण करणा-या माणिकरावांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधवांनीही त्याच भाषेत उत्तर दिलं.
गुंडगिरी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना उमेदवारी दिल्याचा मुद्दा लावून धरत काँग्रेस नेत्यांनी आधी राष्ट्रवादीला टार्गेट केलं. आणि अखेरच्या टप्प्यात थेट निवडणुकीची धुरा वाहणा-या जयंत पाटलांवरच वक्तव्य करून राष्ट्रवादीतच संशय निर्माण करण्याचा प्रयत्न माणिकरावांना केला. त्यामुळं निवडणुकीची रंगत शिगेला पोहोचलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.