www.24taas.com, झी मीडिया, पुणे
महिलेची छेड काढणाऱ्या तरुणांना जाब विचारल्याच्या कारणावरून शिवसेना शाखा प्रमुखाची हत्या करण्यात आल्याची घटना पुण्यात घडलीय. देवा खांडेकर असं या शाखा प्रमुखाचे नाव आहे. पुणे पोलिसांचा गुंडांवर वचक नसल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे. देवा खांडेकरांचा मृतदेह पोलिस स्टेशन वर नेऊन शिवसैनिकांनी या घटनेचा निषेध केला.
देवा खांडेकर हे शिवसेनेच्या अप्पर इंदिरा नगर शाखेचे शाखाप्रमुख होते. रविवारी रात्री ते मुलाला चप्पल घेण्यासाठी शिवराय नगरच्या चौकात आले होते. त्यावेळी दुकानासमोर उभ्या असलेल्या दोघांशी त्यांची बाचाबाची झाली. त्यातल्या एका तरुणानं त्यांना खाली पाडलं, तर दुस-यानं त्यांच्या डोक्यात दगड घातला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण होतं. पुणे पोलीस आणि गुंडांमध्ये साटंलोटं असल्यानंच अशा घटना घडत असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केलाय. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी शिवसैनिक त्यांचा मृतदेह पोलिस स्टेशनवर घेऊन गेले होते.
पोलिसांनी या प्रकरणी ६ जणांना ताब्यात घेतलंय. महिलेची छेड काढल्याचा जाब विचारण्याच्या कारणावरून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
पुण्यातली वाढती गुन्हेगारी आणि हिंसक घटना चिंतेचा विषय होत चाललाय. चोऱ्या-माऱ् तर सोडाच, खून, खंडणी आणि अपहरणासारख्या घटना खुलेआम घडताहेत. अशा परिस्थितीत एखादा कार्यकर्ता समोर येऊन गुंडाशी दोन हात करण्याची तयारी दाखवत असेल तर त्याचीही हत्या केली जातेय. त्यामुळे पुण्यात नेमकं राज्य कुणाचं... कायद्याचं की गुंडांचं असा प्रश्न यानिमित्तानं समोर आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.