www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवडमध्ये ताथवडे भागातल्या विकास आराखड्यात तब्बल 1 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. सर्वसामान्यांना डावलत बिल्डरलॉबीचं हित जपण्यात आल्याचा आरोप करत शिवसेनेनं या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेनं गेल्या महिन्यात ताथवडे भागाचा प्रारूप आराखडा मंजूर केला..पण हा आराखडा बिल्डर लॉबीच्या हिताचा असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. हा आराखडा मंजूर करताना सर्वसामान्य शेतक-यांच्या जमिनीवर आरक्षण टाकण्यात आलं आणि मोठ मोठ्या बिल्डरच्या जमिनींवर आरक्षण ठेवण्यात आलं नसल्याचा आरोप सेनेनं केलाय. ज्या जमिनीवर कृषी उत्पन्न बाजार समिती उभारली जाणार आहे तिथे मात्र जमीन निवासी करण्यात आलीय. हा सगळा प्रपंच बिल्डर लॉबीला खुश करण्यासाठी केला असल्याचा आरोप सेनेनं केलाय.
याबाबत शिवसेनेनं आयुक्तांकडे लेखी हरकत दाखल केलीय. हा विकास आराखडा बदलून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. ताथवडेमध्ये अनेक राजकीय व्यक्तींच्या तसंच मोठ्या बिल्डरच्या जमिनी आहेत. नेमकं त्याच ठिकाणी आरक्षण न पडल्यानं हा योगायोग कसा असा सवाल आता विचारला जात आहे. आता आयुक्त सेनेच्या या आक्षेपांवर काय भूमिका घेतात हे पाहायचंय...