काँग्रेसच्या पोस्टर्सवर कलमाडींच्या फोटोला आक्षेप; वाद विकोपाला

खासदार सुरेश कलमाडी आणि माजी उप-महापौर दीपक मानकर यांच्यातला वाद विकोपाला गेलाय. काँग्रेस भवन आणि काँग्रेसच्या गट नेत्यांच्या महापालिकेतल्या दालनात कलमाडींचे फोटो आजही दिमाखाने झळकतायत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 11, 2013, 10:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
खासदार सुरेश कलमाडी आणि माजी उप-महापौर दीपक मानकर यांच्यातला वाद विकोपाला गेलाय. काँग्रेस भवन आणि काँग्रेसच्या गट नेत्यांच्या महापालिकेतल्या दालनात कलमाडींचे फोटो आजही दिमाखाने झळकतायत. यावरच मानकर यांनी आक्षेप घेतलाय. चार दिवसांत कलमाडींचे फोटो काढले नाहीत तर कार्यकर्ते हे फोटो उतरवतील, असा इशारा मानाकार यांनी दिलाय.
पुणे काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि सबसे बडा खिलाडी अशी सुरेश कलमाडी यांची एकेकाळी ओळख... सध्या मात्र कलमाडी काँग्रेसमधून निलंबित आहेत. तरीही काँग्रेस भवन असो किंवा महापालिकेत काँग्रेसच्या गटनेत्यांचे आणि उप महापौरांचे दालन... कलमाडी आजही असे दिमाखात विराजमान आहेत. तेही सोनिया गांधींच्या बरोबरीने... कलमाडींच्या या फोटोंवर आता पक्षातूनच आक्षेप घेतला गेलाय. माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी कलमाडींचे फोटो हटवण्याची मागणी केलीय. कलमाडी विरुद्ध मानकर या वादाची पार्श्वभूमी मानाकारांच्या मागणी मागे आहे. हा वाद आता वैयक्तिक पातळीवर पोहचलाय. मानकारांनी पुण्यातून लोकसभेची उमेदवारी मागितली आणि त्यानंतर एकेकाळी कलमाडींचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे मानकर कलमाडींचे स्पर्धक बनले.
निलंबित असले तरी, कलमाडींचा पुणे काँग्रेसवर अजूनही चांगलाच प्रभाव आहे तर मसल पॉवरसाठी मानकर ओळखले जातात. त्यामुळे शहर काँग्रेसची चांगलीच गोची झालीय. शहराध्यक्ष अभय छाजेड, महापालिकेतले काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि उप-महापौर बंडू गायकवाड या तिघांनीही या वादापासून पळ काढणंच पसंत केलंय. अखेर प्रदेश प्रवक्ते संजय बालगुडे बोलायला पुढे आले खरे, मात्र त्यांनीही पुन्हा या तिघांकडेच बोट दाखवलंय.
सुरेश कलमाडींची पार्श्वभूमी भ्रष्टाचाराची... तर, गुन्हेगारी ही दीपक मानकारांची पार्श्वभूमी... म्हणजेच करप्शन आणि क्राइम... आत्तापर्यंत आरोप-प्रत्यारोप असं या वादाच स्वरूप होतं. आता मात्र हा वाद हातघाईवर येण्याची शक्यता दिसतेय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.