राज-उद्धव यांनी एकत्र यावं - रामदास कदम

राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असं वक्तव्य शिवसेना नेते रामदास कदम य़ांनीही केलंय. रिपब्लिकन नेते रामदास आठवलेंनंतर आता रामदास कदमांनीही असं वक्तव्य केल्यानं सगळीकडेच आश्चर्य व्यक्त केल्या जातंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 3, 2013, 04:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असं वक्तव्य शिवसेना नेते रामदास कदम य़ांनीही केलंय. रिपब्लिकन नेते रामदास आठवलेंनंतर आता रामदास कदमांनीही असं वक्तव्य केल्यानं सगळीकडेच आश्चर्य व्यक्त केल्या जातंय.
आठवले यांच्यानंतररामदास कदम यांनीही शिवसेना आणि मनसेच्या एकत्रीकरणाची हाक दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी राज-उद्धव या दोन्ही भावांनी एकत्र यावं, अशी अपेक्षा रामदास कदम यांनी व्यक्त केलीय.
उद्धव ठाकरे यांनी याआधीही टाळी दिली होती. त्यानंतर राज ठाकरेही कधी खिडकीतून,कधी वाकून बघत होते. कोण शुकशुक करतंय का, याची वाट बघत होते. हे सगळं करण्यापेक्षा दोन्ही भावांनी एकत्र यायला काय हरकत आहे, असे कदम म्हणाले.

शेवटी दोघेही एका घरातले आहेत. एकत्र बसून त्यांनी विषय संपवून टाकावा. राज यांनी मोठ्या भावाकडे जावं. बोलावं आणि दोघांनी मिळून सत्ता आणून दाखवावी आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करावं असं कदम यांनी पंढरपूर येथे म्हटलंय.
आठवले यांनीही पंढरपूर येथील सभेत बोलताना राज यांनी महायुतीत येण्याचे आवाहन केले होते. मात्र, शिवसेनेने या आवाहनाची खिल्ली उडवली होती. राज यांच्यासाठी आग्रही असलेल्या रिपाइं आणि भाजपला `सामना`च्या अग्रलेखातून सुनावण्यात आलं होतं. त्यामुळे रामदास कदम यांच्या या आवाहनावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याची आता उत्सुकता आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.