राज परत येतील महायुतीच्या नेत्यांना अजूनही आशा

शिवसेनेसोबत जाणार नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं असलं, तरीही भाजप-शिवसेनेचे नेते मात्र आशावादी आहेत.

Updated: Feb 14, 2013, 12:36 PM IST

www.24taas.com, मुंबई
शिवसेनेसोबत जाणार नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं असलं, तरीही भाजप-शिवसेनेचे नेते मात्र आशावादी आहेत. राज ठाकरे महायुतीत येण्याबाबत आपण आशावादी असल्याचं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. तर शिवसेनेनंही आपला पर्याय खुला ठेवला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका पूर्वीच स्पष्ट केलीये. हा पर्याय स्वीकारायचा की नाही, हे राज ठाकरेंवर अवलंबून आहे, असं शिवसेना नेते विनायक राऊत म्हणाले.
राज ठाकरे शिवसेनेला टाळी देणार की टाळणार या प्रश्नाला राज ठाकरेंनी कोल्हापूरच्या सभेत उत्तर दिल होतं. आपण स्वबळावर लढणार असून मला कुठल्याही युतीची गरज नाही. एकत्र येण्याची भाषा अशी वर्तमानपत्रात छापून केली जाते का? असा सवाल करत राज ठाकरेंनी शिवसेनेच्या टाळीला टोला लगावला होता.

मराठी मतं केवळ माझ्यामुळेच फुटतात का? असा सवाल राज ठाकरेंनी केला होता. माझा हा दौरा उभा महाराष्ट्र काबीज करण्यासाठी असल्याची गर्जना राज ठाकरेंनी या प्रसंगी केली होती.