www.24taas.com, नवी दिल्ली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत केलेल्या वक्तव्यांचा तपास वेगानं केला जावा, असे आदेश दिल्ली कोर्टानं दिलेत. राज ठाकरे यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात येणाऱ्या उत्तर भारतीयांना घुसखोर असं संबोधलं होतं.
आपल्या जाहीर भाषणांत उत्तर भारतीयांना घुसखोर म्हणणाऱ्या राज ठाकरेंवरील आरोपांचा तपास चौकशी अधिकाऱ्यांनी तातडीनं करावा, असे आदेश महानगर दंडाधिकारी पवन सिंह राजवत यांनी दिलेत. राज ठाकरे यांच्यावर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अॅडव्होकेट प्रेम शंकर शर्मा यांनी केलेल्या तक्रारीवरून, कोर्टानं राज ठाकरेंविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते.
पोलिसांनी याबाबत प्राथमिक तपास अहवाल दाखल केला आहे. राज यांनी केलेल्या भाषणाबाबतच्या बातम्यांसाठी वर्तमानपत्रांच्या संपादकांना पोलिसांनी नोटीसा पाठवल्यात. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर दैनिकांमध्ये त्यांच्या भाषणाच्या बातम्या आल्या होत्या. त्या बातम्याही तपासासाठी वापरण्यात येणार आहेत. तसंच राज ठाकरे यांचं भाषण तपासण्यासाठी, पोलिसांनी टीव्ही चॅनेल्सकडूनही माहिती मागवली आहे.