‘षण्मुखानंदा’त रंगणार मनसेचा वर्धापन दिन सोहळा!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज सातवा वर्धापन दिन आहे. राज्यातला दुष्काळ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेला त्यांचा वाद, तसेच सेना-भाजप-मनसे अशा विशाल युतीची चर्चा या सर्व पार्श्वभूमीवर आजच्या वर्धापनदिनाला मोठं महत्व प्राप्त झालंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 9, 2013, 09:56 AM IST

www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज सातवा वर्धापन दिन आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या दौऱ्यांनी राज्यातलं राजकारण चांगलच ढवळून काढलंय. राज्यातला दुष्काळ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेला त्यांचा वाद, तसेच सेना-भाजप-मनसे अशा विशाल युतीची चर्चा या सर्व पार्श्वभूमीवर आजच्या वर्धापनदिनाला मोठं महत्व प्राप्त झालंय. आज सकाळी षण्मुखानंद सभागृहात मनसेचा मुख्य कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात राज ठाकरे काय बोलणार याकडं सगळ्यांच लक्ष लागलंय.
२००५ मध्ये शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र` केल्यानंतर राज ठाकरे यांनी ९ मार्च २००६ रोजी मनसेची स्थापना केली. या चार वर्षांच्या काळात मनसेने नगरपालिका व महानगरपालिकांसह लोकसभा व विधानसभेची निवडणूक लढविली. २००९ च्या निवडणुकीत १३ आमदार निवडून आणत मनसेनं विधानसभेत प्रवेश केला. महाराष्ट्रात घुसखोरी करणाऱ्या परप्रांतीयांना रोखणे, रेल्वे भर्तीत मराठी माणसांनाच संधी देण्याची मागणी, महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी शिकवणे अनिवार्य, सर्वत्र मराठी आणि मराठी पाट्यांचाच आग्रह असे काही मुद्दे उचलून मनसेनं लोकांनाच्या जवळ जाण्याच प्रयत्न केला. मुंबई महानगरपालिकेत २८ तर पुणे महानगरपालिकेत २९ नगरसेवक निवडून आणले तर नाशिक माहनगर पालिकेत ४० नगरसेवक निवडून आणत मनसे सत्ताधारी पक्ष बनलाय.

आता, राज ठाकरेंच्या पक्षाला वेध लागलेत ते २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचे. या निवडणूकीत लोकसभेत प्रवेश करण्याचं मनसेचा प्रयत्न असणार आहे. सध्या राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार की नाही याबाबतच्या चर्चांना ऊत आलाय. सेना आणि मनसेच्या नकार घंटेमुळे या चर्चेला तूर्तास विराम मिळाला असला तरी भविष्यात तिघांत चौथा येणार का? ही चर्चाही कार्यकर्त्यांमध्ये दबक्य़ा आवाजात अजूनही सुरूच आहे.