www.24taas.com, कोल्हापूर
आज कोल्हापुरातल्या गांधी मैदानात राज ठाकरे यांच्या दौऱ्यातील पहिलं भाषण केलं. आपल्या भाषणात राज ठाकरेंनी वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला. आपल्याला होत असलेल्या जबड्याचा त्रास आणि सर्दी-खोकला यांच्यावर टिप्पणी करत भाषणाला सुरूवात केली.
सेनेला टोला
राज ठाकरे शिवसेनेला टाळी देणार की टाळणार या प्रश्नाला राज ठाकरेंनी आपल्या भाषणात उत्तर दिलं. आपण स्वबळावर लढणार असून मला कुठल्याही युतीची गरज नाही. एकत्र येण्याची भाषा अशी वर्तमानपत्रात छापून केली जाते का? असा सवाल करत राज ठाकरेंनी शिवसेनेच्या टाळीला टोला लगावला.
मराठी मतं केवळ माझ्यामुळेच फुटतात का? असा सवाल राज ठाकरेंनी केला. माझा हा दौरा उभा महाराष्ट्र काबीज करण्यासाठी असल्याची गर्जना राज ठाकरेंनी या प्रसंगी केली.
परप्रांतीयांवर प्रहार
महाराष्ट्रात मराठी माणसांनाच नोकरीमध्ये प्राधान्य दिले पाहिजे, असा आग्रह धरत राज ठाकरेंनी पुन्हा परप्रांतीयांवर हल्लाबोल केला. हिंदी आणि उर्दू भाषांमधून परीक्षा घेण्याच्या सरकारी जीआरचा दाखला देत राज ठाकरेंनी मराठी माणसाची गळचेपी होत असल्याचं म्टलं. उत्तर प्रदेश-बिहारमधून महाराष्ट्रात ५६ गाड्या येतात. हे सर्व मतांचं राजकारण असून परप्रांतीयांचा टक्का वाढवण्यासाठीच सर्व चालू असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय
यावेळी वृत्तपत्रातील बातमीचा हवाला देत सांगलीमध्ये ९ वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्काराचं उदाहरण राज ठाकरेंनी दिलं. यूपी-बिहारी लोकांवर होणाऱ्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी बिहारी माणसाने ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचं कोर्टात म्हटलं होतं. अशा आपल्या आया-बहिणींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांचे हात-पाय कलम करण्याचा आदेश राज ठाकरेंनी दिला.
नेत्यांची खिल्ली
दरवेळीप्रमाणेच या भाषणातही राज ठाकरेंनी वेगवेगळ्या नेत्यांची नक्कल करत धमाल उडवून दिली. जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावर सतत असणाऱ्या आश्चर्याच्या भावांबद्दल त्यांची खिल्ली उडवली. अजित पवारांची नक्कल करत आपल्याला जमिनीतलं काय कळतं यावर राज ठाकरे बोलले. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही राज ठाकरेंनी टर्र उडवली. राहुल गांधी टेंपो धुवत असल्याप्रमाणे हातवारे करतात असं राज म्हणाले, तर मनमोहन सिंग चावीवर चालत असल्यासारखेच वाटतात, असंही राज यांनी त्यांची खिल्ली उडवताना म्हटलं.
आर आर पाटील यांना जाहीर आव्हान
गृहमंत्री आर आर पाटील यांना जाहीर आव्हान देत पुन्हा आमची शाखा निर्माण होताना कार्यकर्त्यांना जर आडवलंत, तर तिथल्या तिथे गाडून टाकू असाइशारा दिला. आमच्या शाखा, कार्यालये निर्माण करताना आडवे याल, त्यांच्या घरच्यांनाही धमक्या जातील, हे याद राखा.
स्मारकं कशासाठी?
स्मारकांवर होणारा खर्च सांगत शिवाजी महाराजांचं समुद्रात स्मारक बांधण्यापेक्षा महाराजांचे दुर्लक्षित गड-किल्ले यांच्यावर खर्च करून त्यांची डागडुजी करा, असा सल्ला राज ठाकरेंनी दिला. आपल्या किल्ल्यांमधून उभ्या जगाला कळू दे की आपले शिवाजी महाराज कसे होते ते... असंही राज ठाकरे म्हणाले.
टोल आंदोलन
आपल्या टोलनाका विरोधातील आंदोलनामुळे छगन भुजबळ यांना अखेर राज्यातील ६५ टोल नाके बंद करावे लागले, असं राज पल्या भाषणात म्हणाले. खळ्ळ खट्टॅक हेच आपल्या पक्षाच ब्रीद वाक्य असून आम्ही लहान आंदोलनं करत बसत नाहीत, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.