राज ठाकरे योग्यवेळी उत्तर देतील- नांदगावकर

विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंच्या टीकेला मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी जोरदार उत्तर दिलंय. मनसेला नको त्या गोष्टी उघड करण्यास भाग पाडू नका असं सांगत विरोधी पक्षनेत्यांनी आजपर्यंत सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांचा लेखाजोखा द्यावा असं आव्हान दिलंय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 11, 2013, 06:22 PM IST

www.24taas.com, मुंबई
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंच्या टीकेला मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी जोरदार उत्तर दिलंय. मनसेला नको त्या गोष्टी उघड करण्यास भाग पाडू नका असं सांगत विरोधी पक्षनेत्यांनी आजपर्यंत सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांचा लेखाजोखा द्यावा असं आव्हान दिलंय.
ऑक्टोबर २००९ रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. डिसेंबर २००९ आणि मार्च २०१० अधिवेशन झाले. या अधिवेशनात विरोधी पक्षाने हिरानंदानीचा विषय काढला होता. आगरी पाड्याच्या शिवालीचा विषय काढला होता. नाना चौकातील श्रीपती टॉवरचा विषय काढला होता. त्यानंतर पुण्याला टेकड्या बघायला गेले होते. येरवड्याचा विषय काढला होता. या सर्व विषयांचे झाले काय? त्याचा लेखाजोखा त्यांनी सभागृहाला द्यावा, अशी मागणी बाळा नांदगावकरांना आज विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केली. त्यामुळे विरोध आणि सत्ताधारी नाही, तर विरोधकांमध्ये जुंपल्याचे चिन्ह दिसून येत आहे.
या सर्व प्रश्नांचा लेखाजोखा द्यावा, त्यानंतर राज ठाकरे या सर्वावर उत्तर देतील असे, बाळा नांदगावकरांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज ठाकरेंनी नुसते आरोप करू नयेत, तर पुरावे द्यावेत अशा शब्दांत भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पटलवार केलाय. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज यांनी खडसेंवर आरोप केले होते. त्याला आज खडसेंनी उत्तर दिलं. मी सेटिंग करत असतो, तर कोहिनूर मिल माझ्या नावावर असती आणि SRAचे प्रकल्प माझ्या नावावर असते, अशा शब्दांत खडसेंनी राज ठाकरेंना टोला हाणलाय.
स्वबळावर लढण्यावरही राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोमणा मारला. सकाळी स्वबळावर लढण्याची भाषा करायची आणि संध्याकाळी सेटिंग करायचं ही राष्ट्रवादी काँग्रेसची पद्धत असल्याचं मनसे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी १० मार्चला घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोप केले होते. यावेळी त्यांनी एकनाथ खडसेंवरही तोफ डागली होती. ते म्हणाले, एकनाथ खडसे, मनसे आमदारांना बोलू देत नाहीत असा आरोपही त्यांनी केला.

राज ठाकरेंनी खंजीर खुपसला
राज ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्रं सोडल्यावर आता त्यांच्या विरोधकांनीही राज ठाकरेंविरोधात तोफ डागली आहे. शिवसेनेने मनसेवरून भाजपाला टोला दिला आहे.
राज ठाकरे कशाप्रकारे पाठित खंजीर खुपसतात हे आता भाजपला कळलं असेल अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेनेनं दिली आहे. शिवाय सेटलमेंटचे आरोप करुन राज ठाकरे स्टंटबाजी करत असल्याचा आरोप विधानसभेचे शिवसेना गटनेते सुभाष देसाई यांनी केला आहे.