www.24taas.com, मुंबई
माझी भूमिका ही मराठी माणसांसाठीच आहे आणि त्यात अजिबात बदल होणार नाही, असं ठासून सांगत राज ठाकरेंनी एकप्रकारे आपल्या कार्यकर्त्यांच्या कृत्याचं समर्थनच केलंय. आज दुपारी साताऱ्यातल्या सैनिकी शाळेत प्रवेश प्रक्रियेवरुन गोंधळ मनसे कार्यकर्त्यांनी राडा केल्यानं परिसरातलं वातावरण तापलं होतं.
‘मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा’चा जप करणाऱ्या राज ठाकरेंनी शिवसेनेच्या हक्काच्या हिंदुत्वाच्या मुद्यातून अंग काढून घेतलेलं आहे. आपण हिंदुत्वाच्या मुद्यावर नाही तर मराठी माणसासाठी झगडतो, असं आज पुन्हा एकदा राज ठाकरेंनी ठासून सांगितलंय. ‘महाराष्ट्रात जर नोकऱ्या निर्माण होणार असतील तर त्या पहिल्यांदा मराठी माणसाला प्राधान्य दिलं पाहीजे... माझी भूमिका ही सदैव मराठी माणसांच्या हक्कासाठी होती आणि राहील त्यात काडीमात्र बदल होणार नाही’ असं राज ठाकरेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय.
आज साताऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना राडा केल्याने येथील वातावरण तापले आहे. साताऱ्यातल्या सैनिकी शाळेत प्रवेश प्रक्रियेवरुन गोंधळ झालाय. उत्तरप्रदेश आणि बिहारच्या विद्यार्थ्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. आज दुपारीच ही घटना घडलीय. ग्रामीण भागातील मराठी मुलांसाना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने साताऱ्यात ही सैनिकी शाळा सुरू करण्यात आली आहे. मात्र, शाळेतील भरतीमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारी युवकांना प्राधान्य देण्यात येत होते. प्रवेश घेताना वयाचे खोटे दाखले दिल्याचा आरोप मनसेनेने केलाय. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे.