www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच राज्यसभेत नियुक्ती करण्यासाठी सचिनचे नाव सुचविले होते. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली. सचिन २००वी कसोटी खेळून नवृत्त होणार असला तरी सरकार निवृत्तीनंतर त्याला `भारतरत्न` हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्याबाबत विचार करू शकते, असे संकेतही शुक्ला यांनी दिले आहेत.
खेळत असताना राज्यसभेवर जून २०१२साली नियुक्ती होणारा सचिन हा देशातील पहिला खेळाडू ठरला आहे. शुक्ला म्हणाले, `राज्यसभेवर खेळाडू म्हणून नियुक्ती करण्यासाठी लिटिल मास्टर सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांचीही नावं चर्चेत होती पण सोनियांनी वरिष्ठ सभागृहात सचिनची नियुक्ती व्हावी यासाठी आग्रही भूमिका घेतली होती.
`सचिनला राज्यसभेत नियुक्त करण्याची कल्पना माझी नव्हतीच. मी गावसकर किंवा रवी शास्त्री यापैकी एका नावाचा विचार करीत होतो पण सोनिया गांधी यांनी मला याबाबत सचिनकडं विचारणा करण्याची सूचना केली. यावर मी म्हणालो, `सचिन अद्याप खेळतो आहे.` पण तरीही श्रीमती गांधी यांनी सचिनशी एकदा चर्चा तर करा, असा आग्रह धरला. मी सचिनशी बोललो तेव्हा तो ढाका इथं खेळत होता. `माझ्या कुटुंबीयांशी बोलून कळवतो,` असं त्यानं उत्तर दिलं.
काही दिवसानंतर सचिनचा फोन आला तेव्हा तो म्हणाला, `माझ्या कुटुंबाला याबद्दल सविस्तर माहिती नाही पण राज्यसभेवर जाणं म्हणजे नेमकं काय?` असा सचिनचा सवाल होता. नंतरचं काम आम्ही केलं आणि अशाप्रकारे सचिन राज्यसभेत दाखल झाला. `सलाम सचिन`, या एका ग्रृपच्यावतीनं आयोजित कार्यक्रमात शुक्ला यांनी हा खुलासा केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.