भारताच्या हिना सिद्धूला इराणमधून पाठिंबा...

भारताची निशाणेबाज हिना सिद्धूला आता इराणमधूनच पाठिंबा मिळतोय. हिनाच्या समर्थनासाठी इराणमध्ये सोशल मीडियावर मोहीम उघडण्यात आलीय.

Updated: Nov 2, 2016, 08:28 PM IST
भारताच्या हिना सिद्धूला इराणमधून पाठिंबा...

मुंबई : भारताची निशाणेबाज हिना सिद्धूला आता इराणमधूनच पाठिंबा मिळतोय. हिनाच्या समर्थनासाठी इराणमध्ये सोशल मीडियावर मोहीम उघडण्यात आलीय.

सोशल मीडियावर मोहीम

ईराणमध्ये #SeeYouInIranWithoutHijab आणि #CompulsoryHijabIsNOTOurCulture या हॅशटॅगला हजारो नागरिकांनी ट्विट केलंय. 'भारतात खेळांना राजकारण आणि धार्मिक दृष्टीकोनातून पाहिलं जात नाही, ही चांगली गोष्ट आहे' असं एका पोस्टमध्ये म्हटलंय. तर बुरख्याचं बंधन झुगारुन द्यायला हवं, सगळ्यांनी याविरोधात आवाज उठवायला हवे, अशा पोस्टही इराणमध्ये व्हायरल झाल्यात.

भारतीय मौलानांचा इराणला पाठिंबा

मुस्लिम उलेमाचे मौलाना अतहर अलींसारखे काही भारतीय मुस्लीम धर्मगुरूही मात्र याप्रकरणी इराणची बाजू घेतायत. इराण हा इस्लामचे कायदे मानणारा देश आहे, त्यामुळे त्यांच्या नियमांनुसार वागायला हवं, असं त्यांचं मत आहे.

जगभरात इराण आणि सौदी अरेबिया या दोनच देश असे आहेत, ते खेळांमध्येही धार्मिक बंधनं लादतात. त्यामुळे या दोन्ही देशांच्या महिला खेळाडू जगभरात कुठेही स्पर्धा असली तरी बुरखा घालूनच खेळतात. मात्र कुस्ती, जिम्नॅस्टिक अशा खेळांमध्ये बुरखा चालत नाही, त्यामुळे अशा खेळांमध्ये इराणच्या महिलांना भागच घेता येत नाही.

...ही स्पोर्टमनशिप नव्हे

2014 मध्ये झालेल्या 'एशियन गेम्स'मध्ये भारतीय महिला टीमचा ईराणविरोधात कबड्डीचा अंतिम सामना सुरू होता. पण तेवढ्यात इराणच्या खेळाडूचा बुरखा सुटला.... लगेच भारतीय टीमनं सामना थांबवला आणि इराणच्या खेळाडूला तिचा बुरखा बांधायला वेळ दिला.... हा एका परंपरेचा सन्मान होता..... पण दुसऱ्या देशातल्या खेळाडूंवर हे लादणं, याला 'स्पोर्टसमनशिप' म्हणत नाहीत. म्हणूनच हिना सिद्धूनं त्याचा विरोध केला. आता तिच्या समर्थनार्थ खुद्द ईराणमधले नागरिक पुढे येतायत.