बंगळूरू - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात सलग चार दिवस पावसाचा व्यत्यय कायम राहिल्याने अखेर ही कसोटी अनिर्णीत राहिली. पाचपैकी चार दिवस पावसामुळे एकाही षटकाचा खेळ होऊ शकला नाही.
कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताने चमकदार कामगिरी करताना दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या २१४ धावांत संपुष्टात आणला होता. त्यानंतर सलामीवीर मुरली विजय आणि शिखर धवन यांनी पहिल्या दिवसअखेर ८० धावांची दमदार सलामी देत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. त्यामुळे मोहालीप्रमाणे सलग दुसऱ्या सामन्यात जिंकण्याची भारताला आशा होती. मात्र पावसाने भारताच्या सर्व आशांवर पाणी फिरवले.
पहिल्या दिवसानंतर पुढे एकही दिवस खेळ होऊ शकला नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच हे घडत आहे. त्यामुळे कसोटी अनिर्णीत राखण्याचा निर्णय घेण्यात आला असून चार सामन्यांच्या मालिकेत भारत १-० अशा आघाडीवर आहे. भारताची तिसरी कसोटी नागपूरच्या मैदानावर २५ ते २९ नोव्हेंबरदरम्यान खेळवली जाईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.