म्हणून पार्थिव पटेलचं भारतीय संघात पुनरागमन

यंदाच्या रणजी सिझनमध्ये विकेट कीपर रिशभ पंतनं खोऱ्यानं रन केले आहेत.

Updated: Nov 24, 2016, 10:52 PM IST
म्हणून पार्थिव पटेलचं भारतीय संघात पुनरागमन  title=

मोहाली : यंदाच्या रणजी सिझनमध्ये विकेट कीपर रिशभ पंतनं खोऱ्यानं रन केले आहेत. तरीही भारतीय संघामध्ये पार्थिव पटेलची वर्णी लागली आहे. तब्बल आठ वर्षानंतर टेस्ट टीममध्ये पार्थिवला संधी मिळाली आहे. पण पार्थिवचा अनुभव आणि त्याच्या विकेट किपींगच्या कौशल्यामुळे त्याला टीममध्ये संधी मिळाल्याचं वक्तव्य भारताचा कोच अनिल कुंबळेनं केलं आहे.

रिशभनं रणजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे, पण पार्थिवनं बॅटिंग आणि किपींगमध्ये सातत्यता दाखवली म्हणूनच त्याची निवड करण्यात आल्याचं कुंबळे म्हणाला आहे.

वृद्धीमान सहा जखमी झाल्यामुळे पार्थिवला संधी मिळाली आहे. भारतीय संघासाठी सहाच पहिली पसंती असेल अशी प्रतिक्रिया कुंबळेनं दिली आहे. कुंबळेच्या या वक्तव्यामुळे पार्थिवला फक्त एकाच मॅचसाठी ही संधी मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पार्थिवच्या निवडीनंतर रिशभ पंत किंवा दिनेश कार्तिकची निवड का झाली नाही असे प्रश्नही काहींनी उपस्थित केले होते. पण तामिळनाडूकडून खेळताना कार्तिकनं विकेट किपींग केलेली नाही म्हणून त्याचा विचार केला नसल्याचं कुंबळे म्हणाला.

यंदाच्या रणजी ट्रॉफीच्या सिझनमध्ये कार्तिकनं 163, 73, 95, 65 आणि 80 अशा रन केल्या आहेत. तर पार्थिवनं चार इनिंगमध्ये 53, 61, 60 आणि 139 एवढ्या रन केल्या आहेत. रिशभ पंतनं यंदाच्या सिझनमध्ये आतापर्यंत 874 रन केल्या आहेत, यामध्ये चार शतकांचा समावेश आहे.