मुंबई: राष्ट्रीय क्रिकेट निवडकर्ते बांग्लादेश दौऱ्यासाठी उद्या टीम इंडियाची घोषणा करणार आहे. विराट कोहलीच्या हाती टीमची कमान सोपविणार असल्याचं नक्की मानलं जातंय. बीसीसीआयनं सांगितलं की, सीनिअर राष्ट्रीय निवड समितीची 20 मेला बैठक होणार आहे. ज्यात बांग्लादेशविरुद्ध 10 ते 14 जूनदरम्यान होणाऱ्या एक टेस्ट आणि 10 जूनपासून मीरपूरमध्ये होणाऱ्या तीन वनडे मॅचसाठी टीम निवडली जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार कोहलीसह सर्व सीनिअर खेळाडूंनी संदीप पाटील यांच्या नेतृत्वातील निवड समितीकडे ब्रेकची मागणी केली नाही. कोहलीनं अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्टची कॅप्टन्सी केली होती. यानंतर अखेरच्या टेस्टमध्ये सुद्धा कोहलीकडे नेतृत्व सोपवलं गेलं कारण धोनीनं तिसऱ्या टेस्टनंतर टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. फास्ट बॉलर मोहम्मद शामीच्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे आयपीएलमध्ये तो खेळत नाहीय.
जर शामी फिट नसेल तर मुंबईच्या धवल कुलकर्णीला त्याच्या जागी संधी मिळू शकते. याशिवाय ईशांत शर्मा, वरुण अॅरॉन, उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमार टीममध्ये असतील. शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा बॅटिंगचा क्रम पूर्ण करतील. सुरेश रैनाची निवड अजून ठरली नाही. रैना ऑस्ट्रेलियाविरोधातील अखेरच्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये शून्यवर आऊट झाला होता.
विकेटकिपर रिधिमान साहा धोनीची जागा घेऊ शकतो. आर. अश्विन स्पिन आक्रमण सांभाळेल. तर रविंद्र जडेजाची निवडही जवळपास निश्चित आहे. धोनी उपलब्ध असेल तर वनडेची कॅप्टन्सी सांभाळेल. टीम जवळपास तिच असेल जी वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये पोहोचली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.