नवी दिल्ली: डंकन फ्लेचरचा कार्यकाळ संपलेला आहे. टीम इंडियाचा पुढील कोच कोण? या प्रश्नाचं सध्या उत्तर मिळालं नाहीय. मात्र अनेक मोठ्या नावांची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार या रेसमध्ये टीम इंडियाचा माजी कप्तान सौरव गांगुली पण आहे. बीसीसीआयचा एक भाग राहुल द्रविडला ही जबाबदारी सोपवू इच्छितातय तर एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार गांगुलीला कोच व्हायची इच्छा आहे.
बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृत्तपत्रानं ही बातमी दिलीय. कोच पदासाठी गांगुली आणि बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्यात अनौपचारिक चर्चा झालीय. यात माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीनं कोच व्हायची इच्छा व्यक्त केलीय. दरम्यान, दालमियानं याबद्दल कोणतंही आश्वासन दिलं नाहीय.
वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या सूत्रांनी स्पष्ट केलंय की, गांगुलीला या पदासाठी अर्ज करावा लागेल. कोच निवडण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर निर्णय होईल.
राहुल द्रविडही रेसमध्ये
बीसीसीआयच्या एका ग्रृपला राहुल द्रविडनंही या रेसमध्ये सहभागी व्हावं असं वाटतं. त्यांच्या मते राहुल द्रविड एक सन्मानित खेळाडू आहे आणि त्यानं राजस्थान रॉयल्सच्या टीमच्या मेंटर आणि कोचच्या भूमिकेत काम खूप चांगल्या पद्धतीनं निभावलंय. याशिवाय सध्याचा टेस्ट क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहलीची आक्रमकता पाहता टीम इंडियाला अशा व्यक्तीची गरज आहे, जो मदत करू शकेल. द्रविडलाही या पदासाठी अर्ज करावा लागेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.