अखेरच्या ३ षटकांमध्ये ही होती धोनी-कोहलीची रणनीती

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात १८व्या षटकानंतर सामन्याचा निर्णय बदलला. शेवटच्या तीन षटकांत भारताला विजयासाठी ३९ धावा हव्या होत्या. प्रत्येक चेंडूत दोन धावा काढणे महत्त्वाचे होते. या दडपणाखालीही कोहली आणि धोनीने संयमी खेळी करताना भारताला विजय मिळवून दिला.

Updated: Mar 29, 2016, 08:49 AM IST
अखेरच्या ३ षटकांमध्ये ही होती धोनी-कोहलीची रणनीती

मोहाली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात १८व्या षटकानंतर सामन्याचा निर्णय बदलला. शेवटच्या तीन षटकांत भारताला विजयासाठी ३९ धावा हव्या होत्या. प्रत्येक चेंडूत दोन धावा काढणे महत्त्वाचे होते. या दडपणाखालीही कोहली आणि धोनीने संयमी खेळी करताना भारताला विजय मिळवून दिला.

३ षटकांत आम्हाला ३९ धावा करायच्या होत्या. त्यावेळी १८व्या षटकांत मी जेम्स फॉकनरला टार्गेट करण्याचे ठरवले. माझ्या डोक्यात केवळ बाऊंड्रीचे विचार होते. मी १०० टक्के ठरवले होते की मला फॉकनरला लक्ष्य करायचे आहे. ३ षटकांत ३९ धावा बनवायच्या म्हणजे एका षटकांत कमीत कमी १५ धावा तरी झाल्या पाहिजेत. मात्र आम्हाला त्या षटकांत १९ धावा काढता आल्या. याचा विचार मी १६व्या षटकांतच केला होता. जर चेंडू सीमापार धाडण्यात यश मिळाले नाही तर शेवटच्या षटकांत धावांसाठी झगडावे लागेल. त्यामुळे १८व्या षटकांत मी फॉकनरला टार्गेट करायचे ठरवले, असे कोहली म्हणाला.

संथ चेंडूवर योग्य वेळी गॅपमध्ये खेळणे गरजेचे होते. दुसऱ्या बाजूने धोनीची मोठी मदत झाली. आणि दोन धावा काढण्याकडे त्याचा कल होता. याची आम्हाला खूप मदत झाली. यामुळे काही प्रमाणात प्रतिस्पर्ध्यांवर दबाव आणण्यात यश आले. मी संयमीपणे नाबाद ८२ धावांची खेळी करु शकलो याचे श्रेयही धोनीला जाते. त्याने मला शांत राहून खेळण्यास सांगितले. तो मला सतत प्रेरणा देत राहिला. त्यामुळेच मला योग्य फटके मारता आले. धोनी आणि माझ्यात त्यावेळी झालेल्या संभाषणाचा फायदा भारताच्या विजयात झाला, असेही पुढे कोहली म्हणाला.