www.24taas.com, नवी दिल्ली
नुकत्याच पार पडलेल्या टी २० वर्ल्डकप आणि ऑगस्टमध्ये पार पडलेल्या श्रीलंका प्रिमीअर लीग दरम्यान जवळजवळ सहा अम्पायर्सनं ‘चहा-पाणी’ देणाऱ्या टीमच्या बाजूनं निर्णय देण्याची तयारी दाखवली होती. ही गोष्ट एका स्टींग ऑपरेशनमध्ये उघड झालीय.
‘टीव्ही इंडिया’ या चॅनलनं ‘ऑपरेशन वर्ल्ड कप’ नावानं एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं. यामध्ये पाकिस्तानचे नदीम गौरी आणि अनीस सिद्धिकी, बांग्लादेशचे नादिर शाह तसंच श्रीलंकेचे गामिनी दिस्सानायके, मॉरिश विन्स्टन, सगारा गलागे या अम्पायर्सची नावं पुढे आलीत. यापैकी शाह आणि शर्फुदौल्ला इब्ने शाहिद हे सध्या आयसीसीच्या अम्पायर पॅनलमध्ये आहेत.
आयसीसी पॅनल समितीवर असलेले शर्फुदौल्ला इब्ने शाहिद यांनाही चॅनलच्या अंडरकव्हर रिपोर्टरनं याच पद्धतीची ऑफर करण्यात आली होती पण त्यांनी या ऑफरला धुडकावून लावलं. पण नंतर मात्र त्यांनी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर मॅच फिक्सिंगसाठी तयारी दर्शवली.
स्टींग ऑपरेशनमध्ये, शाह यांच्या खुलाशानुसार पाकिस्तानी बॅटसमन नासिर जमशेदनं बांग्लादेश प्रिमीअर लीग दरम्यानच्या मॅचेस ‘फिक्स’ केल्या होत्या. दिस्सानायके यांनी तर एक पाऊल पुढे टाकत ‘श्रीलंकेच्या क्रिकेट अधिकाऱ्यांकडून दारूच्या मोबदल्यात कोणतंही काम करता येतं’ असं म्हटलंय. तर नदीम गौरी यांनी पैशाच्या मोबदल्यात आपण काहीही करण्याची तयारी दर्शविली होती. पाकिस्तानचे अनीस सिद्धीकी यांनी पैशाच्या मोबदल्यात भारताच्या बाजूनं निर्णय देण्याची तयारी दर्शविली होती. याचवेळी त्यांनी भारताच्या बाजूनं निर्णय देण्याना आपण पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही सांभाळून घेऊ, असंही म्हटलं होतं.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलनं या प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरू केलीय. ‘झीरो टॉलरन्स’चा दावा करत आयसीसीनं फिक्सिंग आणि भ्रष्टाचाराला अजिबात सहन करणार नसल्याचं म्हटलंय.