सेमीफायनलसाठी आज विजयाला पर्याय नाही...

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या ‘सुपर-८’मधील अखेरची मॅच रंगणार आहे ती कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर. सेमीफायनल गाठण्याकरता टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकाने पराभूत करण्याचं आव्हान असणार आहे

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 2, 2012, 01:12 PM IST

www.24taas.com, कोलंबो
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या ‘सुपर-८’मधील अखेरची मॅच रंगणार आहे ती कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर. सेमीफायनल गाठण्याकरता टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकाने पराभूत करण्याचं आव्हान असणार आहे तर आतापर्यंत सुपर-८ मधील दोन्ही मॅचेस गमावणारी आफ्रिकन टीम भारताला पराभूत करून आणि नशिबाच्या जोरावर वर्ल्ड कपमधील मोठा उलटफेर करण्यास सज्ज असणार आहे.
‘सुपर-८’ ग्रुप टू मधून कोणती टीम सेमीफायनल गाठणार याचं उत्तर साक्षात ब्रह्मदेवालाही ठाऊक नसेल असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. ‘जर-तर’च्या गणितात अडकलेले भारत-पाकिस्तान, तसंच ‘सुपर-८’मध्ये एक तरी विजय मिळवून मोठा उलटफेर करण्याची संधी शोधणारी दक्षिण आफ्रिका यांमुळे गुंता अधिकच वाढलाय. भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या अखेरच्या सुपर-८ मधील मॅचनंतरच सेमीफायनलचं चित्र स्पष्ट होणार आहे. एकीकडे ऑस्ट्रेलियाविरूद्ध पराभव आणि पाकिस्तानविरूद्ध विजयाची नोंद करणारी टीम इंडिया, तर दुसरीकडे सुपर-८ मधील दोन्ही मॅचेसमध्ये अनपेक्षित पराभवामुळे हैराण झालेली दक्षिण आफ्रिकन टीम वर्ल्ड कपमधील आव्हान कायम राखण्याकरता एकमेकांना भिडणार आहे. सद्यस्थितीत भारतीय टीम आणि आफ्रिकन टीम या तुल्यबळ वाटत असल्या, तरी टीम परफॉर्मन्स म्हणून धोनी ब्रिगेडलाच सर्वांची पसंती मिळतेय. पाकिस्तानविरूद्ध कमबॅक करणारा वीरेंद्र सेहवाग आणि त्याचा दिल्लीचा पार्टनर गौतम गंभीर भारताला तडाखेबंद ओपनिंग करून देण्यास सज्ज असणार आहेत. तर मिडल ऑर्डरमध्ये विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मासह कॅप्टन धोनी आणि युवराज सिंगसारख्या तडाखेबंद बॅट्समनचं आव्हान आफ्रिकन बॉलर्ससमोर असेल.
भारताच्या तुलनेत वेगवान आणि आक्रमक बॉलिंग असणाऱ्या आफ्रिकन पेसर्सना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आलंय. त्यामुळे अखेरच्या ग्रुप मॅचमध्ये आपल्या बॉलिंगची दाहकता सिद्ध करण्याकरता डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल, वेन पार्नेल हे त्रिकूट सज्ज असेल. भारतीय बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये झहीर खान, इरफान पठाण, लक्ष्मीपती बालाजी आणि आर. अश्विन या रेग्युलर बॉलर्ससह, पार्टटाईम बॉलर्सची भूमिका चोख पार पाडणाऱ्या युवराज सिंग आणि विराट कोहलीच्या स्पिन अटॅकचा सामना करण्याचं आव्हान द. आफ्रिकन बॅट्समनसमोर असणार. रिचर्ड लेव्ही आणि हाशिम आमला ही ओपनिंग जोडी आपली छाप पाडण्यात अपयशी ठरलीय. तर जॅक कॅलिस, जेपी ड्युमिनी आणि कॅप्टन ऍबी डिव्हिलियर्स यांना कामगिरीत सातत्य राखता न आल्याचा फटका टीमला बसलाय. त्यामुळे कोलंबोमध्ये रंगणाऱ्या मॅचमध्ये यशस्वी चेंजेस करून नवनवीन प्लानिंग करणारी धोनी ब्रिगेड बाजी मारणार, की आतापर्यंत टीम म्हणून अपयशी ठरलेली द. आफ्रिका वरचढ ठरणार याकडेच साऱ्यांचं लक्षं लागलेलं असणार यांत शंका नाही.