www.24taas.com, पल्लेकल
वेस्ट इंडिजने आपली धडाकेबाज कामगिरी सुरूच ठेवली आहे. ऑस्ट्रेलियासोबत पावसाने घात केल्यानंतर इंग्लंडला मात्र वेस्टइंडिजने आपल्या इंगा दाखवलाच. वेस्ट इंडिजने १५ रनने दिमाखात विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना विंडीजने 20 षटकांत 5 बाद 179 धावा काढल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडला 20 षटकांत 164 धावांपर्यंत मजल मारता आली. या वेळी इंग्लंडच्या हेल्स व मोर्गेनने केलेली 107 धावांची भागीदारी व्यर्थ ठरली.
धावांचा पाठलाग करणा-या इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. रवी रामपॉलने इंग्लंडला पहिल्याच षटकात दोन जबर धक्के दिले. केसवेटर व ल्युक राऊट हे दोघे भोपळा न फोडता तंबूत परतले.दरम्यान, हेल्स-मोर्गनने कंबर कसली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी 107 धावांची भागीदारी केली. हेल्सने 51 चेंडूंत पाच चौकार व 2 षटकार ठोकून 68 धावा काढल्या, तर 36 चेंडूत 4 चौकार व 5 षटकारांसह नाबाद 71 धावा काढणारा मोर्गन इंग्लंडला विजय मिळवून देऊ शकला नाही. विंडीजकडून रामपॉलने 37 धावा देत शानदार दोन बळी घेतले.
तत्पूर्वी विंडीजकडून सामनावीर चार्ल्स व गेलने स्फोटक फलंदाजी केली.या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 103 धावांची भागीदारी केली. यामध्ये गेलने 36 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकार ठोकून 58 धावा काढल्या. चार्ल्सने 56 चेंडूंत 10 चौकार व 3 षटकारांसह 84 धावा काढल्या. त्याने करिअरमधील पहिले अर्धशतक ठोकले. हे दोघे बाद झाल्यानंतर मधल्या फळीतले फलंदाज स्वस्तात बाद झाले.