खूशखबर!!! ब्लॅकबेरीचं बीबीएम अँड्रॉईड आणि आयफोनवर

स्मार्ट फोनचा वापर करणाऱ्या सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी आहे. आता व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी ब्लॅकबेरी मैदानात उतरतंय. आयफोन आणि अँड्रॉईडच्या स्पर्धेत काहीसं मागं पडलेल्या ब्लॅकबेरीनं आता आपलं वैशिष्ट्य असलेली बीबीएम म्हणजे ब्लॅक बेरी मेसेंजर ही सेवा आयओएस (i OS) आणि अँड्रॉईड (Android) या ऑपरेटिंग सिस्टीमवर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 19, 2013, 03:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
स्मार्ट फोनचा वापर करणाऱ्या सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी आहे. आता व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी ब्लॅकबेरी मैदानात उतरतंय. आयफोन आणि अँड्रॉईडच्या स्पर्धेत काहीसं मागं पडलेल्या ब्लॅकबेरीनं आता आपलं वैशिष्ट्य असलेली बीबीएम म्हणजे ब्लॅक बेरी मेसेंजर ही सेवा आयओएस (i OS) आणि अँड्रॉईड (Android) या ऑपरेटिंग सिस्टीमवर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतलाय.
सँमसंग, सोनी, एचटीसी, कार्बन, मायक्रोमॅक्स हे फोन गूगलच्या अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतात, तर अॅपलचे आयफोन आयओएस या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतात. म्हणजेच आता सॅमसंग गॅलक्सी किंवा सोनीच्या एक्स्पिरिया तसंच आयफोनमध्येही ब्लॅकबेरीची बीबीएम सेवा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी फार वाट पाहण्याची गरज नाही. ब्लॅकबेरीने जारी केलेल्या परिपत्रकानुसार येत्या शनिवारपासून बीबीएम अँड्रॉईडवर आणि रविवारपासून आयओएसवर लाँच होणार आहे.
ब्लॅकबेरीची बीबीएम सेवा ही एकेकाळी बिझिनेस क्लासमध्ये सर्वाधिक पसंतीची मानली जात होती. अलीकडे ब्लॅकबेरी बीबीएमची लोकप्रियता काहीशी कमी झाली तरी अजूनही गुप्ततेच्या बाबतीत फक्त बीबीएमलाच प्राधान्य देतात. यासाठी अनेकजण ब्लॅकबेरी आणि अन्य दुसरा स्मार्टफोनही जवळ बाळगायचे. बीबीएम या सेवेनं मोठी विश्वासार्हता कमावली होती.
अँड्रॉईड फोनसाठी गूगल प्लेस्टोअरमधून बीबीएम डाऊन लोड करता येईल तर अॅपल आयफोनसाठी अॅप स्टोअरमधून बीबीएम डाऊनलोड करता येणार आहे. ब्लॅकबेरी फोननं अँड्रॉईडच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी अलीकडंच नवी ऑपरेटिंग सिस्टीमही विकसित केली होती. मात्र त्याला गॅजेट शौकिनांनी म्हणावा असा प्रतिसाद दिला नाही. ब्लॅकबेरीचे बहुतांश ग्राहक फक्त बीबीएमसाठीच ब्लॅकबेरी वापरतात.

मधल्या काळात व्हॉट्सअॅप या मेसेंजर सेवेनं ब्लॅकबेरीच्या बीबीएमसमोर मोठं आव्हान उभं केलं. अल्पावधीतच व्हॉट्सअपचे ३०० मिलीयन म्हणजे तीस कोटीपेक्षा जास्त यूजर्स झाले आहेत. व्हॉट्सअप ही मेसेंजर सेवा मोफत आणि कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारी असल्यामुळं त्याला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यातुलनेत फक्त ब्लॅकबेरीसोबतच येणाऱ्या बीबीएमला खूपच मर्यादित यूजर्स मिळाले. यामुळंच ब्लॅकबेरीनं अँड्रॉईड आणि आयओएस या प्लॅटफॉर्मसोबत जुळवून घेण्याचं धोरण स्वीकारलं आहे.
सध्या फक्त एक मेसेंजर प्लॅटफॉर्म असलेल्या बीबीएमला भविष्यात एक सोशल नेटवर्क म्हणून विकसित करण्याची ब्लॅकबेरीचा मानस आहे. त्यामुळं व्हॉट्सअपचं आव्हान तर पेलता येईलच शिवाय ब्लॅकबेरीचं मार्केटमधील आस्तित्वही कायम राहील, असा विश्वास या क्षेत्रातल्या जाणकारांना वाटतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.