कॉम्प्युटर माऊसचे जनक डग्लस यांचं निधन

कॉम्प्युटरच्या वापरामध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग असलेला आणि जगभरातल्या अनेक गोष्टी एका क्लिकवर आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या माऊसचा क्रांतिकारी शोध लावणारे ज्येष्ठ संशोधक डग्लस एंजेलबर्ट यांचं ८८ व्या वर्षी गुरूवारी निधन झालं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 5, 2013, 08:36 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, सॅन फ्रान्सिस्को
कॉम्प्युटरच्या वापरामध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग असलेला आणि जगभरातल्या अनेक गोष्टी एका क्लिकवर आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या माऊसचा क्रांतिकारी शोध लावणारे ज्येष्ठ संशोधक डग्लस एंजेलबर्ट यांचं ८८ व्या वर्षी गुरूवारी निधन झालं.
फेसबुकवर लाइक, शेअर करण्यासाठी वापरात येणारा ‘माऊस’ (उंदीर)चे जनक डग्लस यांनी १९६० साली पहिला लाकडी कॉम्प्युटर माऊस बनवला. तसेच त्यांनी कॅलिफोर्निया संशोधन संस्थेमध्ये ईमेल, वर्ड प्रोसेसिंग आणि व्हिडीओ टेलिकॉन्फरन्सींग आदी विषयांवरही महत्त्वपूर्ण काम केले होते.
त्यांची किडनी निकामी झाल्यानं दोन दिवसांपूर्वी त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती त्यांच्या मुलीनं दिली. संगणकीय तंत्रज्ञान विकसित करण्यात डग्लस एंजेलबार्ट यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. जगात इंटरनेटची संकल्पना जेव्हा फारशी रुजलीही नव्हती, तेव्हापासून ते वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करत होते.
हायपरलिंक्स, टेक्स्ट एडिटिंग आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसारख्या सर्व संशोधनाचे श्रेय डग्लस यांनाच जाते. १९ डिसेंबर १९६८ साली डग्लस यांनी कॉम्प्युटर माऊसचे प्रात्यक्षिक केल्यानंतर नव्या क्रांतीला सुरुवात झाली. २०००मध्ये त्यांना अमेरीकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या हस्ते तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावरचे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले होते.

पर्सनल कॉम्प्युटिंगमध्ये कॅथोड रे ट्यूबवर आधारित रियल टाइम इंटरॅक्शन, माऊसचे संशोधन, हायपरटेक्स्ट, टेक्स्ट एडिटिंग, ऑनलाइन जर्नल, शेअर स्क्रीन फंक्शन, टेली कॉन्फरन्सिंगसारख्या संशोधनाने त्यांनी कॉप्युटर सामान्यांना वापरता येईल असा इंटरफेस बनवण्याचा पाया रचला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.