www.24taas.com, ठाणे
लकी कंपाऊंड इमारत दुर्घटनेतून धडा घेत ठाणे महापालिकेनं आजपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केलीय. ठाण्यातील मुंब्रा इथल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडणार आहे.
ठाणे महापालिका आयुक्तांनी यासाठी एका विशेष पथकाची स्थापना केली असून हे पथक आजपासून कारवाई करणार आहे. कार्यकारी अभियंत्याच्या नेतृत्वाखालील या पथकात १५ कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. मुंब्र्यातील लकी कंपाऊंड इमारत दुर्घटनेनंतर पालिकेनं अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाईला सुरुवात केलीय.
दरम्यान, लकी कंपाऊंड इमारत प्रकरणी क्राईम ब्रान्चनं आणखी दोन आरोपींना अटक केलीय. फारुख अब्दुल लतीफ छापरा आणि रफिक दाऊद कामदार अशी आरोपींची नावं आहेत. यापैकी फारुख छापरा हा बोगस आर्किटेक्ट आहे तर रफिक कामदार हा इस्टेट एजंट आहे. या दोघांच्या अटकेमुळे याच प्रकरणी अटक केलेल्यांची संख्या एकूण ११ झाली आहे.