मुंबई : पालघर या नविन जिल्ह्याचे नाव आजपासून नकाशावर दिसणार आहे. जिल्ह्याच्या नविन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होवून पालघर या नव्या आदिवासी जिल्ह्याची निर्मीती करण्यात आली.
सध्या या जिल्ह्यात पालघर,वसई, मोखाडा,जव्हार, वाडा, तलासरी,विक्रमगड आणि डहाणु या आठ तालुक्याचा समावेश असुन जवळपास ३० लाख लोकसंख्या नव्या जिल्ह्याची असणार आहे. मागील अनेक वर्षांपासून ठाणे जिल्ह्याचे विभाजन होवून पालघर जिल्ह्याची मागणी प्रलंबित होती. नेहमीच विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जिल्हा निर्मितीचा विषय निघत असे,मात्र प्रत्यक्षात मुहूर्त मिळत नव्हता. शेवटी आघाडी सरकारनं एकमतानं निर्णय घेवून पालघर या नव्या जिल्ह्याची निर्मिती केली. येथिल जनतेची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत असल्याने पालघरमध्ये उत्साहाचे वातावरण आहे..
दरम्यान नव्या जिल्ह्या मुख्यालयासाठी कोणतं ठिकाण असावं यावरुन मोठी खल सुरु झाली. अखेर तो मान पालघरला मिळालाय. नव्या मुख्यालयाच्या एकाच इमारतीत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधिक्षक प्रशासकिय कार्यभार सांभाळणार आहेत. दरम्यान नव्या पालघर जिल्ह्यात वसई-विरार महानगर पालिका, तर जव्हार ,डहाणू आणि पालघर या तीन नगरपरिषदा येत आहेत. जिल्हा परिषदेचे ३७ सदस्य या भागात येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.