मुंबई : सध्या सोशल मीडियावर मेंदीच्या एका फोटोने सर्वांनाच हैराण केलेय. या फोटोत मेंदीमुळे हातावर मोठया प्रमाणात जखमा झाल्याचे दिसतेय. चायनीज मेंदीमुळे हा प्रकार घडल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरतोय.
फेसबुकपासून ते व्हॉट्सअॅपपर्यंत सर्वत्र या फोटोची चर्चा आहे. चायनीज मेंदीमुळे हाताची अशी अवस्था झाल्याचा दावा या फोटोतून केला जातोय. हा फोटो पाहताच कोणाच्याही अंगावर काटाच येईल. त्यामुळे या फोटोमागचे सत्य जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे. एका वृत्तवाहिनीने केलेल्या रिसर्चमध्ये या चायनीज मेंदीचे सत्य समोर आलेय.
या रिसर्चनुसार चायनीज मेंदी हा मेंदीचा प्रकार असतो. अनेक बायका ही मेंदी आपल्या हातावर काढतात. मात्र जर मेंदीमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल उत्पादने वापरली असल्यास काहींना त्याची अॅलर्जी होऊ शकते. अनेकदा मेंदीला गडद रंग येण्यासाठी Paraphenylenediamine सारखी केमिकल वापरली जातात. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे या केमिकलची अॅलर्जी होण्याचा संभव असतो.
विशेष म्हणजे हे केमिकल केस रंगवणाऱ्या डायमध्येही वापरले जाते. अशा डायमुळे अनेकांना अॅलर्जी होतो याचा परिणाम तर अनेकदा अशा लोकांना आयसीयूमध्येही भर्ती करावी लागते. त्यामुळे केमिकलयुक्त मेंदी असल्यास कदाचित त्याचा फोटोतील परिणामासारखे परिणाम हातावर दिसू शकतात. त्यामुळे केवळ चायनीज मेंदीमुळेच नव्हे तर केमिकलयुक्त कोणत्याही मेंदीमुळे अशा प्रकारची अॅलर्जी होण्याची शक्यता असते. म्हणून मेंदी विकत घेताना सावधनता बाळगा. नैसर्गिक मेंदीचा अधिकाधिक वापर करा.