`आप` महाराष्ट्रात कोणाला करणार गप्प?

दिल्लीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीनं आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीय. देशभरातील सर्व ५४३ जागांवर लढण्यापेक्षा नेमक्या आणि मोजक्या (१००) जागांवर लक्ष केंद्रीत करण्याचा त्यांचा विचार आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 30, 2013, 03:52 PM IST

www.24taas.com, धनंजय शेळके, असोसिएट प्रोड्युसर, झी २४ तास
दिल्लीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीनं आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीय. देशभरातील सर्व ५४३ जागांवर लढण्यापेक्षा नेमक्या आणि मोजक्या (१००) जागांवर लक्ष केंद्रीत करण्याचा त्यांचा विचार आहे. `आप`ला दिल्लीप्रमाणे मुंबई आणि महाराष्ट्रातून चांगल्या यशाची अपेक्षा आहे. राज्यात खरचं `आप`ला चांगला प्रतिसाद मिळेल का?, मिळाला तर किती मिळेल? , कोणत्या पक्षाला त्याचा फटका बसेल ? याचा अंदाज वर्तवण्याचा हा प्रयत्न......
जनलोकपालच्या आंदोलनाला महाराष्ट्रातूनही चांगला पाठिंबा मिळाला होता. त्यामुळेच महाराष्ट्रातून आम आदमी पार्टीला जास्तीच्या अपेक्षा आहेत. विशेषत मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर यासारख्या शहरी भागात `आप`ला काही प्रमाणात पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. सध्यातरी भ्रष्टाचारविरोधी लढा हेच आपचे प्रमुख अस्त्र आहे. त्यामुळे स्वच्छ चारित्र्याचे, चांगल्या कामामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या उमेदवारांचा शोध आम आदमी पार्टीकडून घेतला जातोय. त्याचाच एक भाग म्हणून जलसंपदा विभागातला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणारे विजय पांढरे यांना नाशिकमधून उभं करण्याचा विचार सुरू आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यात आपल्या कामाने ठसा उमटवणारे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांना बीड म्हणून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला जातोय. तर तुकाराम मुंडे यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी यासाठी त्यांची मनधरणी केली जातेय. नासातल्या नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात उतरलेले जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दराडे यांना बुलढाण्यातून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. इतर मतदारसंघामध्येही अशाच उमेदवारांचा शोध सुरू आहे.
आम आदमी पार्टीला या घडीला तरी शहरी पार्टीच म्हणावी लागेल. सोशल मीडियावर मते व्यक्त करणारा तरुण वर्ग, राजकारणापासून नेहमीच दूर राहणारा आणि आपल्याच कामात गुंग राहणारा शहरी मध्यमवर्ग हा ढोबळमानाने आम आदमी पार्टीचा मतदार म्हणता येईल. याचा अर्थ इतर लोक `आप’ला मतदान करणार नाहीत असा बिलकूल नाही. त्या-त्या मतदारसंघातली परिस्थिती, तिथले उमेदवार, इतर पक्षांच्या उमेदवारांची इमेज यावर बरेच अवलंबून आहे. उमेदवाराची केवळ चांगली प्रतिमा असून चालणार नाही तर त्याने त्याच्या क्षेत्रात काहीतरी करुन दाखवलेले असावे लागेल. असेच उमेदवार चांगली लढत देऊ शकतील अन्यथा `आप`चे उमेदवार हे इतर पक्षांची मते खाण्याचे काम करतील. उदाहरण द्यायचे झाले तर तुकाराम मुंडे यांनी जालन्यात आपल्या शिस्तप्रिय कामामुळे अगदी १४ महिन्यांच्या कार्यकाळात जालनेकरांच्या मनात चांगली प्रतिमा निर्माण केली होती. जालन्यात विद्यमान खासदार रावसाहेब दानवे आहेत. गेली चार टर्म ते जिंकून आलेले आहेत. यावेळीही त्यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराचे काही आरोप झाले नसले तरी लोकांनी पुन्हा निवडून द्यावे असे कामही त्यांनी मतदारसंघात केलेले नाही. त्यामुळे तिथल्या मतदारांना बदल हवा आहे. मात्र योग्य पर्याय नसल्यामुळे पुन्हा त्यांचीच लॉटरी लागण्याची शक्यता आहे. `आप`ने जर तुकाराम मुंडेंना उमेदवारी दिली तर ते विजयापर्यंत पोहचू शकतात. आपला राज्यात अशीच एखादी-दुसरी लॉटरी लागली तर लागू शकते अन्यथा इतरांना डॅमेज करण्याचं ते काम करु शकतात.
आपचे उमेदवार निवडून येणार नसतील आणि मते खाणार असतील तर ती कोणाची खाणार आणि त्याचा फटका कोणाला बसणार हे पाहू... पहिल्यांदा किंवा दुस-यांदा मतदान करणारा तरुण आणि राजकारणापासून दूर राहणारा वर्ग साधारणपणे भाजप आणि मनसेच्या पाठिशी राहतो असा अनुभव आहे. त्यामुळं आम आदमी पार्टीचा जास्त फटका कोणाला बसणार असेल तर तो भाजप आणि मनसेला. इतर पक्षांनाही काही प्रमाणात फटका बसू शकतो. दिल्लीत मुस्लिम, दलित, झोपडपट्टटीतली मतेही ‘आप’ला पडली आहेत. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीलाही `आप`चा काही प्रमाणात फटका बसू शकतो. अर्थात या जरतरच्या गोष्टी आहेत. केंद्रेकर, तुकाराम मुंडे `आप`चा प्रस्ताव स्वीकारणार का? इतर मतदारसंघात त्यांना चांगले उमेदवार मिळणार का? निवडणुकीपर्यंत इतर कोणती लाट येते का ? `आप`ची लाट एप्रिलपर्यंत किती राहते?, मोदींची लाट किती इम्पॅक्ट घडवू शकते? यावरच राज्यातल्या लोकसभा निवडणुकीतली गणिते अवलंबून आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुक