पंकज दळवी
कुछ अच्छा होना होगा तो दाग अच्छे है...एका वॉशिंग पावडरच्या जाहिरातील हे वाक्य आठवण्याचं कारण आहे सध्याची राज्यतील राजकीय परिस्थिती. उद्धव ठाकरे यांच्या आजारपणामुळे ठाकरे कुटुंबीय लिलावतीत एकत्र आले. गेली काही वर्षे विस्तव न जाण-या दोन भावांमधील प्रेम थेट मातोश्रीपर्यंत पोहोचलं. हे संदर्भ देण्याचं कारण की २२ ऑगस्ट २०१२च्या शिवसेनेचे मुखपृष्ठ ‘सामना’च्या पहिल्या पानावर चक्क महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाची बातमी सकारात्मकरित्या झळकली.
राजकीय इतिहासात नव्यान घडलेली ही पहिली घटना. एरवी सामनामध्ये राज यांची बातमी थोडक्यात या सदरातसुद्धा छापली जात नसे. मनसेनं लोकांच्या हिताचा आणि राष्ट्रहिताचा मुद्धा उचलल्यामुळे ही बातमी सामनाच्या मुखपृष्ठावर छापल्याचं स्पष्टीकरण सामनानं दिलं. सामनाच्या कार्यकारी संपादकांकडून आलेल्या या प्रतिक्रियेनंतर मनात अनेक प्रश्न निर्माण होतात.
गेली काही वर्ष मनसेच्या अजेंड्यावर मराठीचा मुद्दा आहे. तेव्हा शिवसेनेनं मनसेवर उचलेगिरीचा आरोप करत हा मुद्दा शिवसेनेचा असल्याचा स्पष्ट केलं. वास्तविक मराठी हा सुद्धा मराठी माणसाच्या हिताचा मुद्दा होता. मात्र त्यावेळी मनसेला ‘सामना’त जागा नव्हती. एकूणच काय, तर उद्धव ठाकरे यांच्या आजारपणामुळे दोन भावांमध्ये निर्माण झालेल्या कौटुंबिक जवळीकीमुळे आता दोन राजकीय पक्षांमध्ये हळूहळू वैचारीक जवळीक निर्माण होतेय. हा ब्लॉगलिहीत असतानाच माझ्या वरील सर्व विधानांना बळकटी देणारी उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया आली. “ मंगळवारी निघालेल्या मोर्चासारखे मोर्चेनिघणं गरजेचं आहे” आता उद्धव यांची ही प्रतिक्रिया एका भावने दुस-या भावाच्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आहे की, एका पक्षाच्या कार्यकारी प्रमुखाने दुस-या पक्ष प्रमुखाशी जवळीक वाढत असल्याचं सांगणारी प्रतिक्रिया आहे. हे तुम्हीच ठरवा.
अर्थात ठाकरे बंधुंनी एकत्र यावं, ही महारष्ट्रातील प्रत्येकाची इच्छा आहे. असो. तर महत्वाचा मुद्दा हा की गेल्या काही दिवसांत राज आणि उद्धव ठाकरे (शिवसेना-मनसे) यांच्यात वैयक्तीक आणि राजकीय जवळीक वाढतेय. अर्थात या नव्या अध्यायाची सुरूवात उद्धव ठाकरे यांच्या आजापणासारख्या वाईट घटनेतून झाली. म्हणूनच म्हणावंसं वाटतं ‘कुछ अच्छा होना होगा तो दाग अच्छे है...’