किंग खान ४६ वर्षांचा झाला. राज कंवरच्या दिग्दर्शनाखाली ‘दिवाना’ या आपल्या पहिल्याच सिनेमात त्याने दमदार अभिनयाचे दर्शन घडवलं होतं. खरंतर दिल्लीहून डोळ्यात स्वप्नं घेऊन मायानगरी मुंबईत दाखल होणाऱ्या अनेक युवकांपैकी एक अशीच त्याची सुरवातीची ओळख होती. बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर किंवा वलयांकित घराण्याचा वारसा नसताना दिल्लीच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील शाहरुखने बॉलिवूडचा अनिभिष्क्त सम्राट होण्यापर्यंत मारलेली मजल थक्क करणारी अशीच आहे.
शाहरुखने ‘फौजी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आणि तिथून त्याने मोठा पडदाही लिलया व्यापला. आपल्या अभिनय सामर्थ्याने त्याने प्रेक्षकांवर गारूड केलं. यश चोप्रांच्या ‘डर’ मधल्या क..क..किरण म्हणणारी खलनायकी भूमिका त्याने अशी काही वठवली की लोकांना सिनेमाचा ‘हिरो’ सनी देवल आहे याचा विसर पडला. त्याकाळात कॉलेज तरुण शाहरुखच्या अदाकारी फिदा झाले होते. कारकिर्दीच्या सुरवातीला त्याने अशी आव्हानं अनेकवेळा लिलया पेलली. ‘अंजाम’मध्येही त्याने खलनायक साकारला होता. पण त्याच्या कारकिर्दीचा कळसाध्याय ठरला तो आदित्य चोप्रांचाच ‘दिलवाले दुलहनिया ले जायेंगे, त्याच्या आणि काजोलच्या अभिनयाच्या जुगलबंदीने सिल्वर स्क्रिनवर धुमाकूळ घातला.
यश चोप्रांच्या सिनेमात न दिसणारी सशक्त पटकथा हे या सिनेमाचे बलस्थान ठरलं. पण मेलोड्रॅमाटिक अभिनय शैलीने तो दिलीपकुमारची नक्कल करतो असाही आरोप त्याच्यावर झाला होता. अर्थात शाहरुखने त्याच्या प्रतिमेची चौकट मोडत ‘स्वदेस’ आणि ‘चक दे इंडिया’सारख्या सिनेमात सशक्त अभिनयाचा जणू वस्तुपाठच घालून दिला. अर्थात त्याच्या प्रदीर्घ कारकिर्दीत हे सिनेमे अपवाद आहेत. अनेकदा शाहरुख आणि त्याचे दिग्दर्शकही त्याच्या किंग खानच्या प्रतिमेच्या प्रेमात पडले. त्यामुळे हिंदी सिनेमात भूमिका कोणतीही असली तरी ती साकारणाऱ्या अभिनेताच प्रतिबिंब त्यात दिसतं.
रा-वन मध्ये त्याने सुपरहिरो साकारण्याचा प्रयत्न केला आहे. आता रा-वन बद्दल उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असल्या तरी शाहरुख खानने या सिनेमाच्या निर्मितीसाठी तब्बल १२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. शाहरुख खान स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कोणतीही जोखीम पत्करायला तयार असतो हेच यातून अधोरेखित होतं. आणि त्यामुळेच त्याला किंग खान हे बिरुद मिरवण्याचा अधिकार आहे हे मान्य करावं लागेल.