w.24taas.com, मुंबई
मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स आज 17 हजार 94 अंशावर बंद झाला. त्यात 238 अंशाची घट झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज 5 हजार 207 अंशांवर बंद झाला. त्यात 69 अंशांची घट झाली.
मागच्या तुलनेत आज सकाळी बाजार खालच्या पातळीवर उघडला. त्यानंतर सकाळच्या सत्रात बाजार चढायला सुरूवात झाली. दुपारच्या सत्रात बाजार वरच्या पातळीवर स्थिर होता. नंतर काही वेळातचं, अशक्त युरोपियन बाजारामुळे भारतीय बाजार कोसळून गेल्या दोन आठवड्यातील नीचांकाची नोंद झाली. इन्फोसिसच्या महसुलात आणि प्रत्येक शेअरमागच्या मिळकतीत घट झाल्यामुळे इन्फोसिसचे स्टॉक्स आज कोसळले होते. विप्रो आणि टीसीएस या आयटी कंपन्यांच्या स्टॉक्समध्येही घट पहायला मिळाली. लंडनच्या मेटल एक्सचेंजमध्ये वाढ झाल्यामुळे मेटलचे स्टॉक्स वाढले होते.
पावसाचं आगमन वेळेवर होणार असल्याच्या वृत्तामुळे ग्राहकोपयोगी वस्तू बनवणा-या कंपन्यांचे स्टॉक्समध्ये सलग तिस-या दिवशी तेजी होती. त्यापैकी हिंदुस्थान युनिलिव्हर, सिगारेट कंपनी आयटीसीनं आज उच्चांकांची नोंद केली. भांडवली वस्तू बनवणा-या कंपन्यांचे स्टॉक्स सलग दुस-या दिवशी तेजीत होते. मे महिन्यात संसदेत फायनान्स बील मंजूर झाल्यानंतर डिझेलसारख्या सबसिडाईज्ड इंधनांच्या किंमती वाढण्याच्या वृत्तामुळे सार्वजनिक क्षेत्रातल्या ऑईल मार्केटींग कंपनीचे स्टॉक्स वधारले होते.
आगामी चलनविषयक धोरणाच्या आढाव्याच्या पार्श्वभूमीवर व्याजदाराबाबत संवेदनशील असणा-या बॅंकांचे स्टॉक्स सलग दुस-या दिवशी वाढलेले होते. आज सन फार्मा, कोल इंडिया, हिरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, आणि रिलायन्सचे या कंपन्यांचे शेअर्स वधारलेत तर या इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, हिंडाल्को, जिंदालस स्टील कंपन्यांचे शेअर्स घसरलेत.