केशुभाई पटेलांचा राजीनामा, मोदींना झटका

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल आणि माजी केंद्रीय मंत्री कांशीराम राणा यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुले भाजपला जोरदार झटका बसला आहे. पटेल हे पक्ष काढण्याच्या स्थितीत आहेत.

Updated: Aug 4, 2012, 09:07 PM IST

www.24taas.com, अहमदाबाद

 

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल आणि माजी केंद्रीय मंत्री कांशीराम राणा यांनी आज  भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजपला जोरदार झटका बसला आहे. पटेल हे पक्ष काढण्याच्या स्थितीत आहेत.

 

गांधीनगरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना केशुभाई पटेल म्हणाले, की प्रचंड दुःख होत असल्याने मी पक्षाचा राजीनामा देत आहे.  गुजरातमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी दोन महत्त्वपूर्ण नेत्यांनी राजीनामा दिल्याने भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.  ते पक्ष काढण्याच्या तयारीत असल्याने भाजपवर याचा निश्चित परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर केशुभाई पटेल  वारंवार जाहीर टीका केली आहे. आणीबाणीच्या दिवसांपेक्षा गुजरातमधील परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे पटेल यांनी नुकतेच ब्लॉगवर लिहिले होते. त्यामुळे पटेल हे मोदींविरोधात असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता तर त्यांना शह देण्यासाठी पक्षाच्या तयारीला लागले आहेत.

 

 केशुभाई नवा पक्ष स्थापन करणार

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे कट्टर विरोधक केशुभाई पटेल उद्या नवा पक्ष स्थापन करणार आहे. ८२ वर्षीय केशुभाई गेली सहा दशके जनसंघापासून भाजपशी संबंधित आहे. केशुभाईंनी दोनवेळा गुजरातचं मुख्यमंत्रीपदही भूषवलं. मात्र मोदींकडे गुजरातची धुरा आल्यापासून केशुभाई काहीसे बाजूला पडले. आता त्यांनी मोदी विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न चालवलाय.

 

केशुभाईंबरोबर माजी मंत्री कांशीराम राणा यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिलीय. आमचा पक्ष खरा भाजप आहे असं केशुभाईंनी म्हटलय. गुजरातमध्ये भाजप एका व्यक्तीचा पक्ष झालाय असं सांगत त्यांनी मोदींना टार्गेट केलंय. केशुभाईंच्या नव्या पक्षात माजी मंत्री गोर्धन झडाफीया यांचा महागुजरात पक्ष विलीनं होण्याची शक्यता आहे. दरम्यान केशुभाईंच मन वळवण्याचा प्रयत्न करु असं भाजपनं म्हटलय.