www.24taas.com, पाटणा
राष्ट्रपती निवडणुकीवरुन सुरु असलेल्या गोँधळातच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत एनडीएसमोर नवा पेच निर्माण केलाय. मोदींच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीला विरोध करत, धर्मनिरपेक्ष प्रतिमा असलेल्या नेत्यांची वकिली त्यांनी सुरु केली आहे. पंतप्रधानपदाच्या दावेदारीवरुन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी भलेही काही बोलण्यास तयार नसले, तरी त्यांचे विरोधक नितीश कुमार यांनी आधीपासूनच त्यांच्या मार्गावर काटे पेरण्यास सुरुवात केली आहे. नितीश स्वतःला दावेदार मानत नसले, तरी त्यांना मोदींचं नावही मंजूर नाही.
‘एनडीएचा नेता धर्मनिरपेक्ष प्रतिमेचा आणि उदार विचारधारेचा असावा. नेता असा असावा जो बिहारसारख्या कमी विकसित राज्यांचं दुःख जाणतो. केवळ विकसित राज्यांचाच विकास करणारा नसावा.’ असं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नितीश कुमारांनी म्हटलंय.
विरोध फक्त नितीशकुमारांकडून होतोय असं नाही, भाजपचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीही नितीशकुमारांच्या सुरात सूर मिसळलाय. जेडीयू आणि भाजपत सुरु झालेल्या या संघर्षानं एनडीएचे इतर घटक पक्षही अडचणीत सापडले आहेत. नरेंद्र मोदी भलेही भाजपात आपली प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत असले, तरी एनडीएत नितीशकुमारांनी त्यांच्याविरोधात आघाडी उघडलीय. त्यामुळं मोदी आणि भाजपसमोर आता एनडीएच्या घटक पक्षांची समजूत कशी काढायची, हा प्रश्न असेल. बुधवारी होणा-या एनडीएच्या बैठकीत विरोधकांसोबत सुरु असलेल्या युद्धासोबतच, घरात लागलेल्या या आगीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.